प्रशिक्षक कधी मिळणार कोणास ठाऊक!

प्रशिक्षक कधी मिळणार कोणास ठाऊक!

शरथ कमल

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला आता अवघा एक वर्षाचा कालावधी बाकी असताना भारतीय टेबल टेनिस संघाचे नवे विदेशी प्रशिक्षक डेजान पापीच अजूनही संघाला जोडले गेलेले नाहीत. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी तयारी करण्यात भारतीय टेबल टेनिसपटूंना अडचणी येत आहेत. यावर्षी मार्चमध्ये टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने मासिमो कॉस्टनटिनी यांच्या जागी पापीच यांची प्रशिक्षकपदी नेमणूक केली.

मागील वर्षी कॉस्टनटिनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने राष्ट्रकुल स्पर्धा आणि एशियाडमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. भारताला टेबल टेनिसमध्ये ६० वर्षांत पहिल्यांदा पदक मिळवण्यात यश आले. मात्र, त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आणि पापीच हे अनुपस्थित असल्यामुळे खेळाडूंना स्वतःच तयारी करावी लागत आहे.

मासिमो यांना कौटुंबिक कारणांमुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नवे प्रशिक्षक निवडण्यात आले. मात्र, ते अजून संघाला जोडले गेलेले नाहीत आणि ते कधी जोडले जाणार हे माहीत नाही. प्रशिक्षक नसताना ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी तयारी करणे खेळाडूंना अवघड जात आहे. मागील काही काळात मला, साथियन आणि मनिका (बत्रा) यांनाच दमदार प्रदर्शन करता आले आहे. आम्ही स्वतः सराव करून एकेरीत चांगला खेळ करू शकतो, पण दुहेरीत खेळताना आम्हाला प्रशिक्षकाची गरज भासते, असे भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू शरथ कमल म्हणाला.

भारताचे चार टेबल टेनिसपटू ऑलिम्पिकसाठी पात्र झाले असून भारतीय संघही टोकियोमध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी पात्र ठरेल असा शरथला विश्वास आहे.

First Published on: July 23, 2019 4:34 AM
Exit mobile version