मधल्या फळीचा तिढा सुटेना!

मधल्या फळीचा तिढा सुटेना!

धोनी,रिषभ पंत

शेजारी देश बांगलादेशचा पराभव करत विराट कोहलीच्या भारतीय संघाने वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताची या वर्ल्डकपमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांना आतापर्यंत ६ सामने जिंकण्यात यश आले असून, केवळ यजमान इंग्लंडलाच त्यांच्यावर मात करता आली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या स्पर्धेच्या ७ सामन्यांत ५४४ धावा केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

तसेच त्याने या स्पर्धेत विक्रमी ४ शतके लगावत एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याला सलामीचा साथी लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांची चांगली साथ लाभली आहे. कोहलीने या स्पर्धेत सलग ५ अर्धशतके फटकावण्याचा पराक्रम केला आहे, पण त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही ही चिंतेची गोष्ट. मात्र, त्यापेक्षाही चिंतेची बाब आहे भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन.

भारतीय संघ मागील ४-५ वर्षे चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी भरोसेमंद फलंदाजाच्या शोधात आहे. वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीही या क्रमांकावर कोण खेळणार हा मोठा प्रश्न भारतासमोर होता. वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी चौथ्या क्रमांकावर अष्टपैलू विजय शंकर चांगले प्रदर्शन करेल असे मत व्यक्त केले होते. मात्र, त्याला काही सामन्यांत मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला स्पर्धेबाहेर पडावे लागले आणि युवा रिषभ पंतला संधी मिळाली. पंतने इंग्लंडविरुद्ध ३२ आणि बांगलादेशविरुद्ध ४८ धावा करत आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. परंतु, त्याला या जागेवर आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठ्या खेळीची गरज आहे.

मागील अनेक वर्षे महेंद्रसिंग धोनीने भारताच्या मधल्या फळीची धुरा सांभाळली होती. धोनीमुळे कर्णधाराला मधल्या फळीची चिंता करावी लागत नसे. मात्र, धोनीला मागील एक-दीड वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यातच अखेरच्या षटकांतील संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर वारंवार टीका झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये धोनीने विंडीजविरुद्ध अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ७ सामन्यांत ४५ च्या सरासरीने २२३ धावा, ही धोनीची या स्पर्धेतील कामगिरी. ही त्याची कामगिरी निराशाजनक नसली तरी त्याला पूर्वीप्रमाणे प्रभाव पाडण्यात अपयश येत आहे. तसेच डावाच्या सुरुवातीपासून फटकेबाजी करण्याची क्षमता असणार्‍या हार्दिक पांड्याने काही सामन्यांत चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत काही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र, त्यालाही अखेरच्या षटकापर्यंत खेळण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला आणि धोनीला आपल्या खेळात सुधारणा करणे गरजेचे आहे.

केदार जाधवला या स्पर्धेत फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याला छाप पाडता आली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध त्याला वगळून दिनेश कार्तिकची निवड झाली. कार्तिकलाही फार चेंडू खेळायला मिळाले नाहीत. त्यामुळे कार्तिक किंवा जाधव या फलंदाजांपेक्षा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघात स्थान मिळाले पाहिजे, असे मत काही क्रिकेट समीक्षक व्यक्त करत आहेत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी लक्षात घेता रोहित किंवा विराट हे एखाद्या सामन्यात लवकर बाद झाले, तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकेल.

First Published on: July 5, 2019 4:37 AM
Exit mobile version