WI vs PAK Women : विंडीज महिला संघाच्या दोन खेळाडू मैदानातच कोसळल्या; हॉस्पिटलमध्ये दाखल

WI vs PAK Women : विंडीज महिला संघाच्या दोन खेळाडू मैदानातच कोसळल्या; हॉस्पिटलमध्ये दाखल

शिनेल हेन्री (फोटोत) आणि चेडीन नेशन या विंडीजच्या दोन क्रिकेटपटू मैदानातच कोसळल्या

पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दुसरा टी-२० सामना शुक्रवारी अँटिग्वा येथे पार पडला. या सामन्यात शिनेल हेन्री आणि चेडीन नेशन या विंडीजच्या दोन क्रिकेटपटू मैदानातच कोसळल्या. या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शिनेल हेन्री आणि चेडीन नेशन या विंडीजच्या दोन्ही खेळाडू दोन वेगवेगळ्या वेळी मैदानात कोसळल्या. या दोन्ही घटना पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी घडल्या. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता.

दोघींची प्रकृती स्थिर

वेगवान गोलंदाज शिनेल हेन्री आणि फलंदाज चेडीन नेशन यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये हेन्री आणि नेशन या दोघीही शुद्धीत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे, असे क्रिकेट वेस्ट इंडिजकडून सांगण्यात आले. विंडीजने या दोघींच्या जागी बदली खेळाडूंना मैदानात उतरवले. अखेर विंडीजला डकवर्थ-लुईस नियमानुसार सात धावांनी विजय मिळवण्यात यश आले.

आमचा दोघींना पूर्ण पाठिंबा

या परिस्थितीत खेळणे सोपे नव्हते. हेन्री आणि नेशन या दोघी आमच्यासोबत मैदानात नसतानाही आम्हाला विजय मिळवण्यात यश आले याचे समाधान आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीच्या माहितीची वाट पाहत आहोत. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे विंडीजचे मुख्य प्रशिक्षक कर्टनी वॉल्श एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना म्हणाले.

First Published on: July 3, 2021 9:22 PM
Exit mobile version