Wimbledon : जोकोविच पुन्हा विम्बल्डनचा बादशाह; फेडरर, नदालच्या विक्रमाशी बरोबरी

Wimbledon : जोकोविच पुन्हा विम्बल्डनचा बादशाह; फेडरर, नदालच्या विक्रमाशी बरोबरी

नोवाक जोकोविचने सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावले

सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या तिन्ही खेळाडूंना आतापर्यंत २०-२० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्यात यश आले आहे. तसेच जोकोविचचे हे यंदाच्या मोसमातील सलग तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. त्याने याआधी ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या.

जोकोविचने जिंकले सलग तीन सेट

विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचने इटलीच्या सातव्या सीडेड माटेओ बेरेटिनीचे आव्हान ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-३ असे परतवून लावले. या सामन्याची जोकोविचने चांगली सुरुवात करत पहिल्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी मिळवली होती. परंतु, बेरेटिनीने दमदार पुनरागमन करत पहिला सेट टाय-ब्रेकरमध्ये ७-४ असा जिंकला. यानंतर मात्र जोकोविचने सर्वोत्तम खेळ करण्यास सुरुवात केली आणि बेरेटिनीचा त्याच्यासमोर निभाव लागू शकला नाही. जोकोविचने पुढील सलग तिन्ही सेट जिंकत सहाव्यांदा विम्बल्डनचा किताब पटकावला.

First Published on: July 11, 2021 10:38 PM
Exit mobile version