Wimbledon : बेरेटिनीची ऐतिहासिक कामगिरी; हुर्काझचा पराभव करत अंतिम फेरीत

Wimbledon : बेरेटिनीची ऐतिहासिक कामगिरी; हुर्काझचा पराभव करत अंतिम फेरीत

इटलीच्या माटेओ बेरेटिनीची ऐतिहासिक कामगिरी

सातव्या सीडेड इटलीच्या माटेओ बेरेटिनीने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्याची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारा तो इटलीचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने पोलंडच्या हुबर्ट हुर्काझचे आव्हान सहज परतवून लावले. आता रविवारी होणाऱ्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत बेरेटिनीचा नोवाक जोकोविच आणि डेनिस शापोवालोव्ह यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. त्याला अंतिम फेरीत विजय मिळवण्यात यश आल्यास तो ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा ४५ वर्षांतील पहिला इटलीचा खेळाडू ठरेल. अ‍ॅड्रियानो पानात्ताने १९७६ साली फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर इटलीचा खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू शकलेला नाही.

माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दिवस

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत बेरेटिनीने पोलंडच्या हुबर्ट हुर्काझचा ६-३, ६-०, ६-७, ६-४ असा पराभव केला. हुर्काझने याआधीच्या फेरीत महान रॉजर फेडररला पराभूत केले होते. परंतु, बेरेटिनीविरुद्ध तो तिसरा सेट वगळता चांगला खेळ करू शकला नाही. ‘हा माझ्या टेनिस कारकिर्दीतील सर्वोत्तम दिवस आहे. रविवारी काय होते आपण बघू. मी इटलीचे प्रतिनिधित्व करताना केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे,’ असे उपांत्य फेरीतील विजयानंतर बेरेटिनी म्हणाला.

First Published on: July 9, 2021 11:09 PM
Exit mobile version