महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

महाराष्ट्राचे आव्हान संपुष्टात

कबड्डी स्पर्धा

बिहार कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने पटणा येथे सुरू असलेल्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. महाराष्ट्राच्या महिला संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात येण्याची ही पहिलीच वेळी आहे. ‘फ’ गटात समावेश असणार्‍या महाराष्ट्राला शेवटच्या साखळी सामन्यात केरळने १५-२३ असे ८ गुणांनी पराभूत केले. दोन साखळी सामने जिंकूनही महाराष्ट्रावर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की ओढविली.

या गटात महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळ यांनी प्रत्येकी २-२ सामने जिंकल्यामुळे तिन्ही संघांचे ४-४ गुण झाले. त्यामुळे या गटातील कोणते दोन संघ आगेकूच करणार हे ठरवण्यासाठी गुण सरासरी काढण्यात आली. त्यात केरळ संघाचे +४ गुण, राजस्थान संघाचे -० गुण, तर महाराष्ट्राचे -४ गुण होते. त्यामुळे या गटातून केरळ गटविजेते, तर राजस्थान उपविजेते म्हणून बाद फेरीत दाखल झाले.

१९५५ पासून सुरू झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये १९५५ ते १९६० या काळात मुंबई इलाखा म्हणून, तर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर १९६१ ते १९७५ असे सलग विजेतेपद राखले. त्यानंतर एक वर्ष सोडता १९७६ ते १९८२ पर्यंत महाराष्ट्राने पुन्हा विजेतेपद आपल्याकडे राखले. मात्र, १९८२ नंतर महाराष्ट्राच्या संघाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

First Published on: July 14, 2019 4:21 AM
Exit mobile version