जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूसाठी फायनलची संधी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूसाठी फायनलची संधी

पी. व्ही. सिंधूविरूद्ध अकाने यामागुची

भारताची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या नानजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली असून ती उपांत्यफेरीपर्यंत पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या नोझुमी ओकुहराला पराभूत करत सिंधूने उपांत्यफेरीत झेप घेतली आहे. शनिवारी सिंधूचा उपांत्यफेरीचा सामना जपानच्या अकाने यामागुचीविरूद्ध रंगणार आहे.

स्पर्धेतील आतापर्यंतचा सिंधूचा प्रवास

सिंधूने सर्वात आधी स्पर्धेत आपला पहिला सामना इंडोनेशियाच्या फित्रीयानीविरूद्ध खेळला. सामन्यात सिंधूने फित्रीयानीला २१-१४ आणि २१-९ च्या फरकाने नमवत स्पर्धेत विजयी शुभारंभ केला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. त्यानंतर सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या सुंग जी ह्यूनला मात देत उपांत्यपूर्वफेरी गाठली. सामन्यात सिंधूने सुंग ह्यूनला पहिल्या सेटमध्ये २१-१० आणि दुसऱ्या सेटमध्ये २१-१८ च्या फरकाने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

यानंतर काल झालेल्या सामन्यात सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहराला नमवत थेट उपांत्यफेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात सिंधूने पहिला सेट २१-१७ च्या फरकाने जिंकला खरा, मात्र दुसऱ्या सेटमध्ये जपानच्या नोझुमीने अत्यंत चुरशीची टक्कर देत अगदी सामन्याच्या शेवटपर्यंत अप्रतिम खेळ दाखवला. मात्र अखेर सिंधूने आपला खेळ उंचावत २१-१९ फरकाने सेट जिंकत सामना आपल्या नावे केला. या विजयासोबतच सिंधूने उपांत्यफेरीत झेप घेतली.

कधी आणि कुठे बघाल सामना

आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० ला सुरू होणार आहे. आजचा सामना स्टार स्पोर्टस आणि स्टार स्पोर्टस २ एच डी या दोन चॅनेल्सवर बघता येणार आहे. याचसोबत मोबाईलवर सामना बघायचा असल्यास हॉटस्टार ऑनलाइन अॅपवर देखील सामना ऑनलाइन दाखवला जाणार आहे.

First Published on: August 4, 2018 4:22 PM
Exit mobile version