जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा

प्रणॉयने दिला डॅनला पराभवाचा धक्का

भारताचे बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉय आणि साई प्रणित यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. दुसर्‍या फेरीत प्रणॉयने चीनचा महान खेळाडू आणि पाच वेळा विश्व विजेत्या लिन डॅनला पराभवाचा धक्का दिला. महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा-सिक्की रेड्डी या जोडीनेही आगेकूच केली.

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रणॉयने ११ व्या सीडेड चीनच्या लिन डॅनवर २१-११, १३-२१, २१-७ अशी मात केली. प्रणॉयने पहिल्या गेमची दमदार सुरुवात करत ६-२ अशी आघाडी मिळवली. त्याने आपली आघाडी १०-२ अशी वाढवली. यानंतरही त्याने चांगला खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-११ असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये मात्र डॅनने दमदार पुनरागमन केले आणि हा गेम २१-१३ असा आपल्या खिशात घातला. त्यामुळे हा सामना तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये गेला. या गेमची दोन्ही खेळाडूंनी चांगली सुरुवात केल्याने प्रणॉयकडे ६-५ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती.

मात्र, प्रणॉयने खेळ उंचावत पुढील ८ गुण मिळवत १४-५ अशी आघाडी घेतली. पुढील गुण डॅनने मिळवल्यानंतर प्रणॉयने पुन्हा सलग पाच गुण मिळवले आणि १९-६ अशी आघाडी मिळवली. पुढील ३ पैकी २ गुण मिळवत त्याने हा गेम २१-७ असा मोठ्या फरकाने जिंकला. प्रणॉयचा पुढील फेरीत गतविजेत्या जपानच्या केंटो मोमोटाशी सामना होईल.

साई प्रणितने कोरियाच्या डाँग क्यून ली याला २१-१६, २१-१५ असे सरळ सेटमध्ये पराभूत करत तिसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमित रेड्डी या भारतीय जोडीने फ्रान्सच्या जोडीचा २१-१३, २१-१३ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.

First Published on: August 21, 2019 5:44 AM
Exit mobile version