अमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी; कौशिकला कांस्य

अमित पांघलची ऐतिहासिक कामगिरी; कौशिकला कांस्य

Panghal

भारताच्या अमित पांघलने (५२ किलो) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अमित हा भारताचा पहिला बॉक्सर आहे. मनीष कौशिकला (६३ किलो) मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आपल्या पहिल्या जागतिक स्पर्धेत खेळणार्‍या कौशिकला उपांत्य फेरीत क्युबाच्या अव्वल सीडेड अँडी गोमेझ क्रुजने ०-५ असे पराभूत केले. क्रुजने मागील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

५२ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत दुसर्‍या सीडेड अमितने कझाकस्तानच्या साकेन बिबोसीनॉव्हवर ३-२ अशी मात केली. त्यामुळे त्याला किमान रौप्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. शनिवारी होणार्‍या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमितचा सामना उझबेकिस्तानच्या शाखोबिदीन झोईरोव्हशी होईल. या स्पर्धेआधी भारतीय बॉक्सर्सना एका जागतिक स्पर्धेत एकापेक्षा जास्त कांस्यपदक पटकावता आले नव्हते. जागतिक स्पर्धेत भारताच्या विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिधुरी (२०१७) यांनी कांस्यपदके मिळवली आहेत.

अमितने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.त्याने २०१८ साली एशियाडमध्ये सुवर्ण आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. याआधी ४९ किलो वजनी गटात खेळणार्‍या अमितने यावर्षीपासून ५२ किलो वजनी गटात खेळण्यास सुरुवात केली आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावे केले.

सुवर्ण मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न!

उपांत्य फेरीतील सामन्यात मी चांगला खेळ केला. मात्र, ही लढत जिंकण्यासाठी मला अपेक्षित होती, त्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागली. भारतीय बॉक्सिंगसाठी हे खूप मोठे यश आहे. मला मिळालेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. आता मी सुवर्णपदक मिळवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे, असे अमित पांघल म्हणाला. अमितने याआधी २०१७ साली जागतिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

First Published on: September 21, 2019 1:32 AM
Exit mobile version