फिरकीला वाव होताच कुठे?

फिरकीला वाव होताच कुठे?

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत वर्चस्व राहिले ते तेज गोलंदाजांचेच, फिरकीला वाव होताच कुठे? मोसमाच्या पूर्वार्धात खेळल्या गेलेल्या ४५ साखळी सामन्यांत सर्वाधिक बळी मिळविणार्‍या गोलंदाजांच्या यादीत अव्वल पंधरा तेज गोलंदाजच! गेल्या वर्ल्डकपप्रमाणे यंदाच्या वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ‘टॅाप टेन’मध्ये आहेत. स्टार्क २६ बळींसह अव्वल स्थानावर असून बोल्टच्या खात्यात १५ बळी जमा आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दाढीधारी, वयस्कर इम्रान ताहिर, भारताचा युजवेंद्र चहल, बांगलादेशचा शकिब अल हसन यांनी प्रत्येकी ११ बळी मिळवून फिरकीपटूंच्या यादीत सर्वाधिक बळी मिळवले आहेत. यंदा वर्ल्डकपच्या साखळी सामन्यांत तेज, मध्यमगती गोलंदाजांनी फिरकीच्या तुलनेत जवळपास चौपटीने बळी गारद केले, अर्थात त्यांनी फिरकी गोलंदाजांच्या दुपटीने षटके टाकली. तेज गोलंदाजांनी २५०२ षटकांत ४६४ गडी गारद केले ते ३० च्या सरासरीने. फिरकी गोलंदाजांनी १२२५ षटकांत १२९ मोहरे टिपले. प्रत्येक बळीसाठी त्यांना जवळपास ५२ धावा मोजाव्या लागल्या.

जून, जुलैमध्ये इंग्लंडमधील वातावरण पावसाळी असते. यंदा तर पावसामुळे ४ सामने रद्द करण्यात आले. पावसाळी वातावरण, मोसमाचा पूर्वार्ध तसेच कुकाबुराच्या पांढर्‍या चेंडूंची जोडी या सार्‍या गोष्टी फिरकी गोलंदाजांना नव्हे तर तेज गोलंदाजांना अनुकुल. मनावा प्रसाद यांच्या राष्ट्रीय निवड समितीने वर्ल्डकपसाठी भारतीय चमूत कुलदीप यादव, युजवेंद्र चहल (कुलचा) या मनगटी फिरकी जोडगोळीसह रविंद्र जाडेजाच्या डावखुर्‍या फिरकीला प्राधान्य दिले. त्याचप्रमाणे पुणेरी केदार जाधवच्या राऊंड आर्म फिरकीलाही पसंती दिली. साखळी लढतीत कुलदीप यादवचा प्रभाव पडला नाही. ७ सामन्यांत ६ बळी ही कामगिरी निराशाजनक.

त्याचा साथीदार चहलने मात्र साखळी लढतीत ११ मोहरे टिपले. रविंद्र जाडेजाला संधी लाभली ती उशिरानेच, श्रीलंकेविरुद्ध साखळीच्या अखेरच्या लढतीत! उपांत्य लढतीत ओल्ड ट्रॅफर्डवर न्यूझीलंडविरुद्ध मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उठवून १० षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात जाडेजाने निकोल्सची विकेट काढली. जाडेजाला साखळीत जास्त संधी न दिलयाबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने नाराजी व्यक्त केली. उपांत्य लढतीत न्यूझीलंडविरुद्ध चहल महागडा ठरला. १० षटकांत ६३ धावांच्या मोबदल्यात त्याला एकमेव बळी मिळाला तो केन विल्यमसनचा, जाडेजाने त्याचा झेल पकडला.

दक्षिण आफ्रिकेचे आव्हान साखळीतच आटोपले. इम्रान ताहिर, ड्युमिनीने वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केली. ४० वर्षीय ताहिरने ११ मोहरे टिपून आपली छाप पाडली. ताहिरसह शम्सीचीही द.आफ्रिका संघात निवड करण्यात आली होती. परंतु, त्याला फारशी संधी लाभली नाही. दक्षिण आफ्रिकन संघाचा भर होता तेज गोलंदाजांवर. रबाडा, इंगिडी, स्टेन, मॅारिस या तेज चौकडीचा फारसा प्रभाव पडला नाही. दुखापतग्रस्त स्टेन मायदेशी परतला, तर इंगिडीलाही दुखापतीने सतावल्यामुळे काही सामन्यांना मुकावे लागले.

बांगलादेशच्या शकीब अल हसनने अष्टपैलू खेळाची छाप पाडताना ६०० हून अधिक धावा फटकावल्या. शिवाय आपल्या फिरकीने ११ मोहरे टिपून उपयुक्तता सिद्ध केली. त्याच्या या कामगिरीचे मात्र चीज झाले नाही, कारण बांगलादेशचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. पाकिस्तानकडून शादाब खानने फिरकीचा वापर करताना ६ बळी मिळवले. परंतु, पाकच्या आक्रमणाचा भर तेज गोलंदाजीवर असल्यामुळे फिरकीला फारसा वाव मिळाला नाही. इंग्लंडमधील वर्ल्डकप स्पर्धेत अपेक्षेनुसार तेज, मध्यमगती गोलंदाजांना बरकतीचे दिवस आले. फिरकीपटूंना मात्र खास यश लाभले नाही.

First Published on: July 10, 2019 4:54 AM
Exit mobile version