कोहलीबाबत विल्यमसनचे मोठे विधान, म्हणाला… 

कोहलीबाबत विल्यमसनचे मोठे विधान, म्हणाला… 

विराट कोहली आणि केन विल्यमसन

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट राखून विजय मिळवत पहिले टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते, हे आव्हान न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ८ विकेट राखून पूर्ण केले. न्यूझीलंडच्या या विजयानंतर विल्यमसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी एकमेकाला मिठी मारली. सध्याच्या घडीच्या दोन मोठ्या क्रिकेटपटूंमधील ही गळाभेट चाहत्यांच्या फार पसंतीस पडली. तो क्षण खूप खास असल्याचे विल्यमसन आता म्हणाला.

आमची मैत्री क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठी

भारताविरुद्ध खेळणे हे नेहमीच मोठे आव्हान असते. क्रिकेटच्या सर्व प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) भारतीय संघ एकाप्रकारे स्तर निश्चित करतो. त्यांची बरोबरी करण्याचा इतर संघांचा प्रयत्न असतो. विराट आणि माझ्या मैत्रीबाबत बोलायचे, तर आम्ही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहोत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तो फोटो आणि तो क्षण खूप खास होता. आमची मैत्री ही क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठी आहे, असे विल्यमसन एका मुलाखतीत म्हणाला.

दोन्ही संघांना विजय मिळवायचा होता

तसेच अंतिम सामन्याबाबत विल्यमसनने सांगितले, अंतिम सामना खूपच चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी दर्जेदार खेळ केला. दोन्ही संघांना विजय मिळवायचा होता. सामन्यादरम्यान कोणता संघ जिंकणार हे सांगणे अवघड होते. परंतु, शेवटी सामन्याचा एकच विजेता असतो. एका संघांना जेतेपदाची ट्रॉफी मिळते आणि दुसऱ्या संघाला दुर्दैवाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागते.

First Published on: July 1, 2021 6:33 PM
Exit mobile version