WTC Final : ठरले! रोहितसोबत ‘हा’ फलंदाज येणार सलामीला; अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर

WTC Final : ठरले! रोहितसोबत ‘हा’ फलंदाज येणार सलामीला; अंतिम सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर

मयांक अगरवाल की शुभमन गिल; रोहितचा सलामीचा साथीदार ठरला 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना पसंती देण्यात आली आहे. हा अंतिम सामना साऊथहॅम्पटन येथे होणार असून वातावरण आणि खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी,उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या पाच वेगवान गोलंदाजांची १५ सदस्यीय संघात निवड केली आहे.

मयांक अगरवाल, अक्षर पटेल आऊट

भारताने इंग्लंड दौऱ्यासाठी २० जणांचा संघ निवडला होता. परंतु, आयसीसीच्या नियमांनुसार, अंतिम सामन्यासाठी संघांना केवळ १५ खेळाडूंची निवड करण्याची परवानगी आहे. त्यामुळे भारताला लोकेश राहुल, मयांक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर या पाच खेळाडूंना अंतिम सामन्यासाठीच्या संघातून बाहेर ठेवावे लागले आहे.

शुभमन गिलला पसंती 

न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहितसोबत भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार, याबाबत मागील काही दिवसांत बरीच चर्चा सुरु होती. भारताकडे गिल, मयांक आणि राहुल यांचा पर्याय उपलब्ध होता. अखेर भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा गिलला पसंती दर्शवली आहे. भारताच्या खेळाडूंनी नुकताच आपापसात सराव सामना खेळला. या सामन्यात गिलने ८५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात रोहितसोबत तो सलामीला येईल.

First Published on: June 15, 2021 8:07 PM
Exit mobile version