WTC Final : अंतिम सामन्यासाठी इंग्लिश पंचांची निवड; क्रिस ब्रॉड असणार सामनाधिकारी

WTC Final : अंतिम सामन्यासाठी इंग्लिश पंचांची निवड; क्रिस ब्रॉड असणार सामनाधिकारी

रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकल गॉफ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. १८ जूनपासून साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी इंग्लंडच्या रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकल गॉफ यांची पंच म्हणून निवड झाली आहे. तसेच इंग्लंडचे माजी सलामीवीर आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉडचे वडील क्रिस ब्रॉड हे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच इलिंगवर्थ आणि गॉफ यांच्याप्रमाणेच आयसीसी एलिट पॅनलचे सदस्य असलेले रिचर्ड केटेलबोरो यांची तिसरे पंच म्हणून, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ यांची चौथे पंच म्हणून नेमणूक झाली आहे.

ऐतिहासिक सामन्यासाठी सर्वोत्तम पंचांची निवड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अनुभवी पंचांची निवड झाल्याचे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. कोरोना महामारीचा काळ सर्वांसाठी अवघड आहे. परंतु, अशा परिस्थितीतही या ऐतिहासिक सामन्यासाठी आम्हाला सर्वोत्तम आणि वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पंचांची निवड करता आली हे आमचे भाग्य आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असे आयसीसीचे सिनियर व्यवस्थापक (पंच आणि सामनाधिकारी) अ‍ॅड्रीयन ग्रिफिथ म्हणाले.

अंतिम सामन्यात न्यूझीलंड बाजी मारेल 

भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड बाजी मारेल, असा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसला विश्वास आहे. न्यूझीलंड अंतिम सामन्यात बाजी मारले आणि ते हा सामना ६ विकेट राखून जिंकतील. माझ्या मते, न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे सर्वाधिक धावा करेल आणि ट्रेंट बोल्ट सामन्यात सर्वात जास्त विकेट घेईल, असे स्टायरिस म्हणाला.

First Published on: June 8, 2021 9:26 PM
Exit mobile version