WTC Final : कोहली किंवा रहाणे नाही; सेहवागने सांगितला भारताचा हुकमी एक्का

WTC Final : कोहली किंवा रहाणे नाही; सेहवागने सांगितला भारताचा हुकमी एक्का

चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पुढील शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्यात भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. या दोन्ही संघांमध्ये मॅचविनर खेळाडू असल्याने अंतिम सामना चुरशीचा होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. परंतु, या सामन्यात भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडचे ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी हे प्रमुख वेगवान गोलंदाज अडचणीत टाकू शकतील, असे भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला वाटते. तसेच भारतीय संघाला इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करायची असल्यास सलामीवीर रोहित शर्माने दमदार खेळ करणे गरजेचे असल्याचेही सेहवाग म्हणाला.

इंग्लंडमध्येही धावा करेल याची खात्री

ट्रेंट बोल्ट आणि रोहित शर्मा यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. रोहितने खेळपट्टीवर वेळ घालवला आणि बोल्टची सुरुवातीची षटके खेळून काढली, तर त्याची फलंदाजी पाहताना खूप मजा येईल. या दौऱ्यात सलामीवीर म्हणून रोहितची भूमिका खूप महत्वाची असणार आहे. रोहित उत्कृष्ट फलंदाज असून त्याला याआधी (२०१४) इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. त्याने सलामीवीर म्हणून मागील काही काळात खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आता तो इंग्लंडमध्येही धावा करेल याची मला खात्री आहे, असे सेहवाग म्हणाला.

सुरुवातीची १० षटके खेळून काढावीत

रोहितला डावाच्या सुरुवातीला सावध फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीची १० षटके खेळून काढल्यास त्याला खेळपट्टी आणि परिस्थितीचा अंदाज येईल. त्याने खेळपट्टीवर वेळ घालवल्यास तो त्यानंतर आक्रमक शैलीत फलंदाजी करू शकेल, असेही सेहवागने सांगितले. इंग्लंडमध्ये कसोटीत सलामीवीर म्हणून खेळण्याची रोहितची ही पहिलीच वेळ असणार आहे.

First Published on: June 12, 2021 3:51 PM
Exit mobile version