तुझा निडरपणा मला खूप आवडला; कोहलीने केले मयांकचे कौतुक

तुझा निडरपणा मला खूप आवडला; कोहलीने केले मयांकचे कौतुक

मयांक अगरवाल आणि विराट कोहली

भारताचा सलामीवीर मयांक अगरवालने २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दौऱ्यासाठी सुरुवातीला मयांकची संघात निवडही झाली नव्हती. परंतु, पृथ्वी शॉला झालेल्या दुखापतीमुळे मयांकसाठी भारतीय संघाची दारे खुली झाली. या मालिकेच्या पहिल्या दोन कसोटीत मुरली विजय आणि लोकेश राहुलने सलामीवीराची भूमिका पार पाडली. मात्र, दोघांनाही धावांसाठी झुंजावे लागल्याने तिसऱ्या कसोटीत मयांकला पदार्पणाची संधी मिळाली. तुला संधी मिळाली कारण स्थानिक क्रिकेटमध्ये तू ज्या जिद्दीने आणि निडरपणे खेळत होतास, ते मला खूप आवडले होते, असे भारताचा कर्णधार विराट कोहली मयांकला म्हणाला.

फार विचार करावा लागला नाही

मी तुला आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळताना पाहिले होते. तिथेही तू आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा अगदी सहजपणे सामना करायचास आणि आक्रमक फलंदाजी करून त्यांच्यावर दबाव टाकायचास. तू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बराच काळ सातत्यपूर्ण कामगिरी करत होतास. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुला कसोटी पदार्पणाची संधी देण्यासाठी मला फार विचार करावा लागला नाही, असे कोहलीने सांगितले. तो मयांकसोबत बीसीसीआय टीव्हीच्या कार्यक्रमात संवाद साधत होता.

हीच तुझी खास गोष्ट

तू स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत होतास. मात्र, धावांपेक्षा, तू ज्या जिद्दीने आणि निडरपणे खेळत होतास, ते मला फार आवडले होते. त्यामुळे तुला संधी देणे मला योग्य वाटले. तू आक्रमक शैलीत खेळतोस आणि निकालांचा फार विचार करत नाहीस. हीच तुझी खास गोष्ट आहे, असेही कोहली मयांकला म्हणाला. मयांकच्या ७६ आणि ४२ धावांमुळे भारताने मेलबर्न कसोटी १३७ धावांनी जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. चौथी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

First Published on: July 30, 2020 1:00 AM
Exit mobile version