पेट्रोल दरवाढीवर इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय, कंपनीकडून प्री बुकिंगची घोषणा

पेट्रोल दरवाढीवर इलेक्ट्रिक स्कूटरचा पर्याय, कंपनीकडून प्री बुकिंगची घोषणा

आथर एनर्जी कंपनीची इलेक्ट्रिक स्कुटर

इलेक्ट्रिक हायवे, इलेक्ट्रिक कारचा बोलबाला असतानाच आता इलेक्ट्रिक स्कूटरही भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची राईड घ्यायची असेल तर जूनपासून यासाठीची बुकिंग सुरू होईल. वाढते प्रदूषण आणि इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक स्कूटर हा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. बंगळुरूस्थित इलेक्ट्रिक स्टार्ट अप आथर एनर्जीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्री बुकिंगबाबतची घोषणा केली आहे. एस ३४० या इलेक्ट्रिक स्कूटरच्या मॉडेलची बुकिंग जून २०१८ पासून सुरू होईल. सुरूवातीच्या टप्प्यात फक्त बंगळुरूमधीलच लोक ही बाईक घेऊ शकतात, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. इतर चार शहरांमध्ये या स्कूटरच्या उपलब्धततेबाबतची घोषणा वर्षअखेरीस होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

एस ३४० हे स्कूटरचे पहिले-वहिले प्रोटोटाईप मॉडेल २०१६च्या सुरुवातीला पहायला मिळाले होते. गेल्या वर्षीच हे मॉडेल मार्केटमध्ये लाँच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण काही कारणास्तव हे मॉडेल रखडले.

कशी आहे इलेक्ट्रिक स्कूटर?

एस ३४० या मॉडेलमध्ये चार्जिंग पॉईंट, ऑनबोर्ड चार्जर, चार्जिंग पॉड, वॉटरप्रूफ डॅशबोर्ड, बॅटरी, चार्जर यासारख्या सुविधा आहेत. महत्त्वाचे म्हणजे चार्जिंगशी संबंधित सगळे पर्याय हे सीट स्टोरेजमध्ये सामावतात. कम्बाईन्ड ब्रेकिंग सिस्टीम त्यासोबतच रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, मोटर कूलिंग, पार्किंग असिस्ट, पुश नेव्हिगेशन, चार्जिंग लोकेशन ट्रॅकिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधांचाही त्यामध्ये समावेश आहे. स्कूटरसाठी लिथिअम आयर्न बॅटरीचाही वापर करण्यात आला आहे. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फास्ट चार्जिंग मोडदेखील या स्कूटरसाठी देण्यात आला आहे. या पर्यायामुळे बॅटरी एका तासात ८० टक्के चार्ज होणे शक्य होते.

स्कूटरसाठीचे बुकिंग जरी पुढच्या महिन्यात सुरू होणार असले तरी व्यावसायिक उत्पादन मात्र जुलैमध्ये सुरू होईल. त्यामुळे ई स्कूटरची राईड घेण्यासाठी आणखी थोडीशी वाट पहावी लागेल!

First Published on: April 28, 2018 2:47 PM
Exit mobile version