मलब्याखाली अडकलेल्यांना शोधणारा ‘अजब’ रोबोट !

मलब्याखाली अडकलेल्यांना शोधणारा ‘अजब’ रोबोट !

रोबोट (प्रातिनिधक फोटो)

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. तर दुसरीकडे अनेक कंपन्या भविष्यात माणसांचीही जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती करत आहेत. दरम्यान काही शास्त्रज्ञांनी नुकतीच एका आगळ्यावेगळ्या रोबोटची निर्मिती केली आहे. या रोबोटचं वैशिष्ट्यं म्हणजे हा उपलब्ध जागेनुसार आपला आकार लहान करु शकतो आणि अडचणीच्या जागेतूनही सहज वाट काढू शकतो. तसंच उंच ठिकाणांवरही तो सहजरित्या चढाई करु शकतो. त्यामुळे हा रोबोट मलब्याच्या किंवा दलदलीच्या तसंच अपघातग्रस्त ठिकाणी बचावकार्य करणाऱ्यांच्या नक्कीच उपयोगी पडू शकतो, असा शोधकर्त्यांचा दावा आहे.

बचाव कार्यासाठी फायदेशीर

‘द रायसिंग स्प्रॉल-ट्युन्ड ऑटोनॉमस रोबोट’ (RSTAR) असं या भन्नाट रोबोचं नाव आहे. या रोबोटच्या पायाला फिरती चाकं बसवण्यात आली आहेत. ही चाकं गरज असेल तेव्हा वेगळी होऊ शकतात आणि स्वत:हूनच पुन्हा रोबोटच्या बॉडीला जोडली जाऊ शकतात. ईस्राइलच्या बेन-ग्युरिअन युनिव्हर्सिटीमधील संशोधक डेव्हिड झरक यांच्या म्हणण्यानुसार, हा रोबोट सपाट जमीनवर सरकू किंवा चालू शकतो. तसंच भिंतीवर किंवा उंचवट्यावर चढाई करु शकतो. इतकंच नाही तर बोगदा, पाईप किंवा निमुळत्या जागांमधून सहज आरपार जाऊ शकतो. उपलब्ध जागेप्रमाणे आपला आकार छोटा करु शकण्याचीही या रोबोटमध्ये क्षमता आहे. याच सर्व वैशिष्ट्यपूर्ण फिचर्समुळे हा रोबोट बचाव कार्यामध्ये मदत करु शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

R-STAR ची वैशिष्ट्यं

आरस्टार रोबो त्याच्या चाकांच्या सहाय्याने, सपाट जमीनीवर एका सेंकदात ३ फुट अंतर पार करु शकतो. तसंच तो आपल्या चाकांचं ‘स्पोक व्हिल्स’मध्ये रुपांतर करुन वाळू, चिखल आणि खडबडीत जागेतूनही न फसता आणि वेगाने वाट काढू शकतो. याशिवाय हा रोबो भिंतीवर किंवा लाकडावर आपली चाकं दाबून सरपटू देखील शकतो. सध्या या रोबोटचं मिनी आणि ट्रायल व्हर्जन बनवण्यात आलं आहे.

First Published on: July 23, 2018 3:27 PM
Exit mobile version