लवकरच येणार What’s App पेमेंट फीचर

लवकरच येणार What’s App पेमेंट फीचर

व्हॉट्स अॅप (सौजन्य - व्हॉट्स अॅप वेब)

What’s App हे सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. दरवेळी हे अॅप नवीन नवीन फीचर घेऊन येत असतं. ज्यामुळं त्याची प्रसिद्धी वाढतच जात आहे. आता लवकरच हे अॅप ‘पेमेंट फीचर’ घेऊन येत असून सध्या देशभरात १० लाख लोक याचं परीक्षण करत आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत शासन, एनपीसीआय आणि काही बँकांसह याचा विस्तार करण्यासाठी काम चालू आहे. यामुळं पेटीएमसारख्या अॅपना नक्कीच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

फीचरसाठी टेस्टिंग चालू

व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, साधारण १० लाख लोक सध्या व्हॉट्स पेमेंट फीचरचं टेस्टिंग करत आहेत. या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. मेसेज पाठवण्यासारखेच पैसे पाठवता येत असल्यामुळं लोकांना यातून आनंद मिळतो आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि देशाच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला पाठिंबा मिळण्यासाठी सध्या व्हॉट्स अॅप भारत शासन, काही बँका आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्याशी चर्चा करत आहे.

आदान-प्रदानासाठी व्हॉट्स अॅपला एनपीसीआयची संमती

व्हॉट्स अॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयचीच्या माध्यमातून वित्तीय आदान – प्रदान बँकांशी करण्यासाठी एनपीसीआयकडून संमती मिळाली आहे. यापूर्वी पेटीएमच्या संस्थापक विजयशेखर शर्मा यांनी व्हॉट्स अॅप हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नसल्याचा आरोप लावला होता. पण आता एनपीसीआयकडून संमती मिळाल्यामुळं व्हॉट्स अॅपवर लवकरच पेमेंट फीचर येऊ शकते.

आतापर्यंत व्हॉट्स अॅपने नवीन आणलेल्या फीचर्सचा युजर्सना चांगला फायदा झाला आहे. पेमेंट फीचर आल्यानंतर त्याचा किती फायदा होऊ शकेल हे लवकरच कळेल.

First Published on: June 18, 2018 1:48 PM
Exit mobile version