चीनच्या बहिष्काराचा भारतीयांना विसर; चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोन विक्रीचा नवा रेकॉर्ड

चीनच्या बहिष्काराचा भारतीयांना विसर; चीनी कंपन्यांच्या स्मार्टफोन विक्रीचा नवा रेकॉर्ड

प्रातिनिधिक छायाचित्र

भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी भारतीयांनी मोठ्या जोशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु केली होती. Bycott China, Boycott Chinese Products असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता. आपण चीनला आर्थिक रसद पुरवत असल्याचे नवनवीन आकडे समोर येत होते. मात्र तेच मध्यम वर्गीय भारतीय दुसऱ्या बाजुला चिनी कंपन्यांच्या मोबाईलवर तुटून पडले आहेत. ई कॉमर्स साईटवरुन डिस्काउंट घेत शाओमी Xiaomi Indiaचे मोबाईल विकत घेण्याची स्पर्धा लागली आहे. मागच्या एका आठवड्यात शाओमीने भारतात ५० लाख स्मार्टफोनची विक्री केल्याची माहिती मिळत आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन ई कॉमर्स साईट्सनी दिलेल्या भरघोस डिस्काऊंटचा फायदा घेत हा विक्रीचा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे.

शाओमीचा भारतातील कारभार पाहणाऱ्या Mi India तर्फे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, भारतातील १५ हजार मोबाईल दुकानदार आणि ई कॉमर्स साईट्सच्या माध्यमातून देशभरात ५० लाख स्मार्टफोन विक्रीचा विक्रम कंपनीने नोंदविला आहे. तसेच भारतातील १७ हजार पिनकोडवर फोन डिलिव्हरी करण्याचाही विक्रम कंपनीने केला आहे.

Mi India चे व्यापार प्रमुख रघु रेड्डी यांनी सांगितले की, “५० लाख स्मार्टफोन विक्री केली, याचाच अर्थ ५० लाख ग्राहकांनी आमच्यावर विश्वास दाखविला आहे. आपल्याला माहितीच आहे की, असा विक्रम याआधी कोणत्याही ब्रँडने केलेला नाही. लोकांना रास्त दरात उच्चतम दर्जाचे उत्पादन देण्याचा प्रयत्न यापुढील काळात देखील आम्ही करत राहू.”

फक्त शाओमीच नाही तर चीनच्या इतर कंपन्यांनी देखील या फेस्टिव्ह सीझनमध्ये चांगलीच कमाई केलेली आहे. Realme, Poco, One plus, Vivo, Oppo या चीनी ब्रँडच्या उत्पादनांना देखील मोठी मागणी आहे. तसेच डिस्काऊंटमुळे या ब्रँडच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चीनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी काही दिवसांतच हवेत विरल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

First Published on: October 25, 2020 6:04 PM
Exit mobile version