ठाणे जिल्ह्यातून कोकणात होळीनिमित्त 110 जादा गाड्या, नागरिकांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे जिल्ह्यातून कोकणात होळीनिमित्त 110 जादा गाड्या, नागरिकांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे । होळी निमित्त चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जात असतात. त्यासाठी ठाणे एसटी विभाग सज्ज झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यांदाच्याच्या वर्षी ही एसटी महामंडळाने 22 मार्चपासून 26 मार्चपर्यंत होळीच्या जादा बसेस कोकणाकडे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठ्या प्रमाणावर सुटका होणार होणार असून नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. त्यानुसार होळीच्या सुट्टयांच्या कालावधीत ठाणे 1 आणि ठाणे 2 या आगारांसह कल्याण आणि विठ्ठलवाडी या चार एसटी आगारांतून नियमित गाड्यांव्यतिरिक्त 110 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या सोडण्यात येणार्‍या जादा बसेसमध्ये देखील शासनाने लागू करण्यात आलेल्या सवलतींचा लाभदेखील प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली.

होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीने 110 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, लांजा, मंडणगड, महाड, दापोली आणि गुहागरला जाणार्‍या नोकरदारांसाठी 22 ते 26 मार्च दरम्यान गाड्यांचे नियोजन आहे. प्रवाशांनी तिकीट आरक्षित करून सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन आगारातर्फे करण्यात आले आहे. कोकणात होळीला जाणार्‍यांची संख्या पाहता 22 ते 26 मार्च या कालावधीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे-1 आगारातून 23, ठाणे-2 आगारातून 36, कल्याण आगारातून 22 आणि विठ्ठलवाडी आगारातून 29 अशा 110 गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. त्याचबरोबर ग्रुपबुकींग देखील सुरु झाल्याचे वाहतूक निरीक्षक सोनवलकर यांनी सांगितले.

असे आहे नियोजन
ठाणे 1 – महाड, पाली, पोलादपूर, चिपळूण, मंडणगड, दुर्गेवाडी-मंजुत्री, कासे माखजन, दापोली
ठाणे-2 शिरगाव, फौजी आंबवडे, चिपळूण, शिवथरघळ, बीरमणी, कोतवाल, दापोली, महाड, साखरपा, शिंदी, गुहागर, खेड, देवळी, भेदवाडी
कल्याण – पोलादपूर, कोतवाल, दिवेआगार, फौजी आंबवडे, शिवथरघळ, खेड, चिपळूण, दापोली
विठ्ठलवाडी- चिपळूण, तळिये, दापोली, ओंबळी, गुहागर, मुरुड, रत्नागिरी, काजुर्ली, कासे माखजन, गैराटे वाडी, दापोली, साखरपा.

First Published on: March 11, 2024 10:30 PM
Exit mobile version