जुळून आला अनोखा योग, ठाण्यात ४५ नवदांपत्य लग्नाच्या बेडीत अडकणार

जुळून आला अनोखा योग, ठाण्यात ४५ नवदांपत्य लग्नाच्या बेडीत अडकणार

व्हॅलेन्टाईन डे ला बऱ्याच जणांनी आपला लग्नाचा बार उडविल्यानंतर मंगळवारी असलेल्या 22022022 या अनोख्या तारखेच्या योगाचे साक्षीदार होण्यासाठी याचदिवशी आपल्या नव्या इनिंगला काही मंडळी सुरुवात करणार आहेत. त्यानुसार ठाणे विवाह नोंदणी निबंधक कार्यालयात तब्बल ४० ते ४५ नवदांपत्यांनी आपली नोंदणी करून लग्नाच्या बेडीत अडकण्याचा संकल्प केला.

नोंदणी केल्यानंतर कोर्ट मॅरेज करण्यासाठी ६० दिवसांची मुदत असल्याने ही संख्या अचानक वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर हा योग असामान्य आहे. तसेच ही संख्या डावीकडून किंवा उजवीकडून वाचली तरी एक सारखीच असल्याचे मत खगोलतज्ञांनी वर्तविले आहे.

लग्न सोहळा हा प्रत्येकासाठी एक आगळावेगळा सोहळा असतो. तो नेहमीच लक्षात रहावा, यासाठी कोणी व्हॅलेन्टाईन डे ला किंवा कोणी साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या मुहूर्त साधून करताना दिसत आहेत. त्यातच 22022022 ही तारीख ही तशीच आहे. या तारखेचा योग आणि ती संख्या कायमस्वरूपी लक्षात राहील अशीच आहे. त्यामुळे ठाणे विवाह नोंदणी कार्यालयात तब्बल ४० ते ४५ जणांनी विवाह करण्याचे आयोजले आहे. यासाठी या मंडळींनी एक महिन्यापूर्वी येऊन तशी नोंद केलेली आहे. त्यामुळे मंगळवारी आलेल्या 22022022 तारखेचे औचित्य साधले जाणार हे मात्र तितकेच खरे आहे.

” ही तारीख परत इतक्या लवकर येणार नाही. तसेच हा एक योगायोग जुळून आला आहे. डावा बाजूने वाचा किंवा उजव्या बाजूने वाचले तरी संख्या सारखी आहे. तसेच इंग्रजीत ही संख्या उलटी केली तरी ती सारखीच आहे.”

– दा कृ सोमण, खगोलतज्ञ, पंचांगकार

First Published on: February 21, 2022 9:52 PM
Exit mobile version