पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना पकडले

ठाणे । अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह पकडलेला टेम्पो सोडविण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करुन एक लाख 90 हजारांची लाच घेणारे कळवा पोलीस ठाण्याचे हवालदार माधव दराडे यांना पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर ताब्यात घेण्यात आले. तसेच दराडे यांना प्रोत्साहन देणारे कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार तानाजी पोतेकर यांनाही ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी या दोघांविरोधात कळवा पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे एसीबीने गुरुवारी दिली.

तक्रारदारांचा नाशिक येथील वाडीवरे येथे अ‍ॅल्युमिनियम पट्टी बनविण्याचा कारखाना आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीतील अ‍ॅल्युमिनियम पट्ट्या हा माल मुंबईमध्ये विक्रीसाठी एका टेम्पोमधून पाठविला होता.16 एप्रिल 2024 रोजी तो टेम्पो मालासह कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी पकडला होता. त्यामुळे तक्रारदार हे मालासह टेम्पो सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. त्याचवेळी हवालदार दराडे यांनी त्यांना तो माल आणि टेम्पो सोडविण्यासाठी स्वत:साठी तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक तुषार पोतेकर आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे दिले नाही तर माल आणि गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात सडत राहील, अशी धमकीही दिली. तसेच 24 एप्रिल 2024 पर्यंत दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.

तक्रादाराने त्याच दिवशी ठाणे एसीबीत जाऊन या प्रकाराबाबतची तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 24 एप्रिल रोजी ठाणे एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. तेव्हा हवालदार दराडे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे आणि पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांनी दराडे यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. हवालदार दराडे यांना तक्रारदाराकडून पोलीस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावर एक लाख 90 हजारांची लाच घेताना पकडले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. याप्रकरणी तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक राजेश जागडे हे करीत आहेत.

First Published on: April 25, 2024 9:41 PM
Exit mobile version