kalyan crime:बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी जबर जखमी

kalyan crime:बाटली डोक्यात पडल्याने विद्यार्थी जबर जखमी

कल्याण : कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागात गुरुवारी रात्री आपली खासगी शिकवणी संपवून एक विद्यार्थी घरी चिंचपाडा येथील आपल्या घरी पायी चालला होता. त्यावेळी काटेमानिवली भागात एका इमारतीमधून अचानक अज्ञात इसमाने जोराने दारूची रिकामी बाटली रस्त्याच्या दिशेने फेकली. ती बाटली विद्यार्थ्याला लागल्याने तो जबर जखमी झाला आहे. लोकेश उमेश पाटील असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो चिंचपाडा भागात राहतो. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लोकशेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांंनी सांगितले, लोकेश पाटील काटेमानिवली भागातील मिताली हाईट्स इमारतीमध्ये एका खासगी शिकवणी वर्गासाठी जातो. गुरुवारी रात्री नऊ वाजता शिकवणी वर्ग संपल्यानंतर लोकेश चिंचपाडा येथील आपल्या घरी पायी चालला होता.

काटेमानिवली भागातील फुडीच कॉर्नर दुकानासमोरून जात असताना अचानक फुडीज कॉर्नर इमारतीच्या वरच्या मजल्यावरून अज्ञात व्यक्तिीने एक रिकामी दारूची बाटली वेगाने रस्त्याच्या दिशेने फेकली. ती बाटली रस्त्यावरून चाललेल्या लोकेश पाटीलच्या डोक्यात पडली. बाटली डोक्यावर आपटून फुटल्याने लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा विषय त्याने कुटुंबीयांना सांंगितला. कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
हवालदार के. डी. चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First Published on: April 28, 2024 9:21 PM
Exit mobile version