मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

मतदान ओळखपत्र नसल्यास आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड देखील पर्याय

ठाणे : ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुध्दलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने फोटोसह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्ताऐवज, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कं. कर्मचाऱ्याचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार/एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.

यापैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या  कलम 20 ए अंतर्गत मतदारयादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्ट मधील तपशिलाच्या आधारे ओळखले जातील.

First Published on: March 22, 2024 10:10 PM
Exit mobile version