मंत्रालयात राहून ठाण्यावर वर्चस्वाचा प्रयत्न

मंत्रालयात राहून ठाण्यावर वर्चस्वाचा प्रयत्न

ठाणे शहर माझे आहे, असे म्हणणारे नेते मंत्रालयात आहेत. प्रत्येक गल्लीत माझे वर्चस्व राहावे, अशी त्यांची भावना आहे. मात्र, कोरोनाच्या आपत्तीत ठाणे शहर वाचविणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कौतूक केले जात नाही, अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला. त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे यांनी प्रसिद्ध केलेली सेवाव्रती पुस्तिका सरकारी प्रशासनाला भविष्यात मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला.

भारतीय जनसंघाचे शिल्पकार, एकात्मिक मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भाजपच्या खोपट येथील कार्यालयात समर्पण दिन पाळण्यात आला. या कार्यक्रमावेळी कोविड योद्धा म्हणून कामगिरी करणाऱ्या ठाण्यातील नागरिकांवर आमदार निरंजन डावखरे यांनी तयार केलेल्या सेवाव्रती पुस्तिकेचे आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते, या वेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक आदी उपस्थित होते. या वेळी कोविड योद्धा म्हणून पुस्तकात नोंद झालेले काही सेवाव्रतीही उपस्थित होते. त्यातील आयुर्वेद अभ्यासक डॉ. सॅम पीटर न्यूटन यांनी मनोगत व्यक्त केले.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर अंत्योदय ही कल्पना साकारली. पंडितजींच्या एकात्म मानवतेच्या कल्पनेतून भारताकडून जगातील ५३ देशांना कोरोनाची लस दिली जाणार आहे, असे आमदार आशिष शेलार यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, “कोरोना आपत्तीत वयोवृद्ध फिरोझी खुस्त्रोशाही यांनी व्हॉट्स अॅप ग्रूपच्या माध्यमातून ७० हजार रुपये जमवून मुक्या प्राण्यांबरोबरच नागरिकांना मदत केली. तर गणेश सोनावणे यांनी जीवाचा धोका पत्करून मृतदेह बॉडी बॅगमध्ये पॅक केले. अशा सेवाव्रतींमुळेच ठाणे शहर कोविडच्या आपत्तीतून बचावले. मात्र, ठाण्यावर मंत्रालयातून वर्चस्व ठेवणाऱ्यांना कोरोना काळात कार्य करणाऱ्या नागरिकांबद्दल कौतूक नाही. सेवाव्रतींनी केलेले कार्य म्हणजे जाज्वल्य सेवेचा यज्ञ होता. त्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी कोविड योद्ध्यांवर प्रकाशित केलेली सेवाव्रती पुस्तिका ही पुढील काळात सरकारी प्रशासनाला दिशादर्शक ठरेल. असे त्यांनी सांगितले.

First Published on: February 11, 2021 9:50 PM
Exit mobile version