भिवंडीत गणेश दर्शनावरून परतणार्‍या मायलेकरांचा अपघाती मृत्यू

भिवंडीत गणेश दर्शनावरून परतणार्‍या मायलेकरांचा अपघाती मृत्यू

भिवंडी – ठाणे बायपास रस्ता हा रात्रं-दिवस वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. गुरुवारी सायंकाळी या रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मायलेकराचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेबीबाई बाळाराम काकडे (४८) व नितीन बाळाराम काकडे (२६) रा.आमणे पाडा ता.भिवंडी अशी वाहन अपघातात मृत्यू झालेल्या आई व मुलाची नावे आहेत.

आमणे पाडा निवासी दोघे मायलेक पुर्णा येथील आपल्या मुलीकडे गणपती दर्शनाकरिता गेले होते. गणपतीचे दर्शन घेऊन तेथे जेवण उरकले व ते सायंकाळी आपल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी मुंबई-नाशिक महामार्गावरून जात असताना माणकोली गावाच्या हद्दीतील मे.अरुणकुमार क्वारी समोरील रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे मायलेक दुचाकीवरून रोडवर फेकले गेले.

त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला त्यातच अज्ञात वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेने आमणे पाडा गावांवर मोठी शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणी स्थानिक नारपोली पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

First Published on: September 16, 2021 11:40 PM
Exit mobile version