राज्य महामार्गावर अपघात सुरूच

राज्य महामार्गावर अपघात सुरूच

अंबरनाथ । अंबरनाथ येथील कल्याण, बदलापूर राज्य महामार्गावरून उल्हासनगर दिशेने जाताना एका भरधाव कंटेनर चालकाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
कल्याण, बदलापूर राज्य महामार्गाचे रूंदीकरण करताना एमएमआरडीएच्या ढिसाळ कारभारामुळे महामार्गावर अपघात होत आहेत. या राज्य महामार्गाचा पाच वर्षांपूर्वी एमएमआरडीएकडून विकास करण्यात आला. मात्र या मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटवण्यातील अडथळ्यांमुळेच राज्य महामार्गाचे काम पाच वर्ष रखडलेल्या अवस्थेत सुरू होते.

त्यातील उल्हासनगर महापालिका हद्दीतून जाणार्‍या मार्गावर अद्यापही 12 बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने या मार्गावर अनेक ठिकाणी प्रवासाला ब्रेक लागत आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ नगरपालिका हद्दीतही पहायला मिळते. अंबरनाथ शहरातून जाणार्‍या या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी एमएमआरडीए आणि प्रशासकीय समन्वयाअभावी अंबरनाथ तहसील कार्यालय, महावितरण कार्यलय, पोलीस ठाणे, डीएमसी कंपनीशेजारील बंद कंपनी आदी भागातील अतिक्रमणे न हटवताच या रस्त्याचा विकास करण्यात आला. त्यामुळे या रस्त्यावरील भरधाव वाहने अचानक अरूंद रस्त्याच्या भागातून जातांना अपघाताच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेतील घनशाम चव्हाण (26) हा तरूण डीएमसी कंपनीसमोरून जात असताना या ठिकाणी मागून आलेल्या एका भरधाव कंटेनरचा दुचाकीस्वाराला धक्का लागल्याने दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून कंटेनर चालक रमेश चौरसिया यांच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

First Published on: February 4, 2024 10:55 PM
Exit mobile version