अनधिकृत बांधकाम प्रकरणी अधिकार्‍यावर कारवाई

अनधिकृत बांधकाम प्रकरणी अधिकार्‍यावर कारवाई

ठाण्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी अखेर कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना 45 दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. यासंदर्भाचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत. कळवा प्रभाग समितीचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात प्रभाग समितीचे कार्यालयीन अधीक्षक सोपान भाईक यांच्याकडे सोपविण्यात आला असुन सुबोध ठाणेकर यांची विभागीय चौकशी देखील होणार आहे.
ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजल्याने भाजपचे आमदार संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकांबाबत अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. महापालिका आयुक्त अनधिकृत बांंधकामांवर कारवाईचे आदेश देतात. परंतु निर्ढावलेले अधिकारी फक्त नोटिसांचा खेळ खेळतात असा आरोप आ. केळकर यांनी केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामांवर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठिशी घालणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले होते.

अनधिकृत बांधकाम प्रकरणात ठाणे महापालिकेचे कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भाचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आदेश काढले आहेत. सुबोध ठाणेकर यांना 45 दिवस सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे निदर्शनास आणून देखील सुबोध ठाणेकर यांनी कारवाईची मानसिकता दाखविली नाही. कळवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, अशा बांधकामांना रोखण्यात आले नाही. ही बाब नागरिकांच्या जीवाशी खेळणारी आहे. काही महिन्यापूर्वी सुबोध ठाणेकर यांच्याकडून खुलासा मागवुन त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही समर्पक खुलासा केलेला नाही, अथवा कामकाजामध्येही सुधारणा करण्याची मानसिकताही दाखवली नसल्याने ही कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे.

त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कालावधीत झालेल्या अनधिकृत बांधकामांची वैयक्तीक जबाबदारी त्यांच्यावर निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सक्तीच्या रजेच्या कालावधीनंतर त्यांची नियुक्ती अकार्यकारी पदावर करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केवळ कळवा परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई झाली असली तरी अद्याप ठाणे मनपा क्षेत्रातीत अन्य प्रभाग क्षेत्रात कारवाई कधी होणार ? असा सवाल केला जात आहे.

First Published on: December 24, 2023 9:27 PM
Exit mobile version