सोने घेऊन फरार झालेल्या कारागिराला अटक

सोने घेऊन फरार झालेल्या कारागिराला अटक

येथील पूर्व भागातील नेहरु रस्त्यावरील एका सराफाने दुकानातील 12 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दुकानातील कारागिराकडे दिले. इच्छित स्थळी कारागिराने न जाता ते दागिने घेऊन तो फरार झाला. गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला होता. रामनगर पोलिसांनी तात्काळ तपास करुन कारागिराला अटक केली. या प्रकाराने जवाहिर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दोन महिन्यापूर्वी असाच प्रकार कल्याणमध्ये झाला होता. त्यावेळी कारागिराने लाखो रुपयांचे दागिने पळविले होते. त्याला नंतर राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले, बसंतीलाल चपलोत (66) यांचे डोंबिवलीतील नेहरु रस्त्यावर प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रम गोपाळ रावल (28) हा काही वर्षापासून विश्वासाने काम करतो. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळी विक्रमकडे दुकानातील 12 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होलमार्क करण्यासाठी दिले. ते इच्छित स्थळी नेणे विक्रमकडून अपेक्षित होते, मात्र दागिने न देता तो पसार झाला होता.

विक्रम गुरुवारी संध्याकाळी दुकानातून सोन्याचा ऐवज घेऊन बाहेर पडला. तो इच्छित स्थळी पोहचला आहे का म्हणून मालक बसंतीलाल यांनी त्याला संपर्क केला. तेथे तो पोहचला नसल्याचे आढळून आले. त्यांनी होलमार्क केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधला. तेथेही तो गेला नसल्याचे आढळून आले. या प्रकाराने अस्वस्थ बसंतीलाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विक्रमची परिसरात शोधाशोध केली. तो कोठेच आढळला नाही. त्याचा मोबाईल बंद आढळला.
विक्रमने विश्वासघात करुन सोन्याचा ऐवज लांबविला असल्याची खात्री पटल्यावर बसंतीलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात विक्रम विरुध्द तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली.

चपलोत यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यात आले. शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाचवेळी तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे विक्रम ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना पाहताच विक्रम पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याच्याकडून नऊ लाखाच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळी असा 12 लाख 72 हजाराचा ऐवज जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली. विक्रम भगतसिंग रस्त्यावरील एका सोसायटीत राहतो. साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, हवालदार नीलेश पाटील, विशाल वाघ, निसार पिंजारी, नितीन सांगळे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. कोळसेवाडी पोलिसांनी या अटकेसाठी साहाय्य केले.

First Published on: September 1, 2023 10:38 PM
Exit mobile version