ठाण्यात रंगली राजकीय धुळवड

ठाण्यात रंगली राजकीय धुळवड

ठाणे। ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी धूळवड महोत्सव सुरू केला होता. या निमित्त ठाण्यात राजकीय धुळवड रंगल्याचे चित्र होते. ‘भारत देश एकाच भगव्या रंगात रंगला असताना काही जण मात्र दुसर्‍याच रंगात रंगले’ असल्याचा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर राष्ट्रवादी नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील खोपट परिसरातील हंस नगर येथे होलीका दहन केले. यावेळी ‘जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा, अशी घोषणा देत अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टिका केली तर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ अशी घोषणा करत आव्हाड समर्थकांनी शिंदे सरकार आणि त्यांच्या शिवसेनेवरही नाव न घेता निशाणा साधला. तसेच ठाण्यातील किसन नगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब होलीका दहन केले. सर्वांच्या आयुष्यातील दुःख, वेदना पवित्र होळीच्या अग्नीत दहन होऊ दे, अशी प्रार्थना केली.

रुसवे-फुगवे बाजूला ठेवण्याचा आजचा दिवस. एकमेकांबरोबर चांगल्या प्रकारे खेळली पाहिजे. विरोधक सत्ताधारीही या दिवशी एकत्र येतात. कटुता दूर करणारा हा सण आहे. काही लोकांनी भगवा रंग सोडला आहे. ज्यांनी भगवा रंग सोडून जो रंग धारण केला आहे तो त्यांना लखलाभ असो, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरेंचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग, प्रभू रामाचा भगवा रंग पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहोत, असे सांगत श्रीकांत शिंदे यांनी धुळवड साजरी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. किसन नगर येथील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतलेल्या होळी उत्सवात मुख्यमंत्री यांची पत्नी लता शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली, नातू रुद्रांश तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होत. तसेच ठाण्यातील किसन नगर येथील शिवसेना शाखेमध्ये आणि टेंभी नाका येथील आनंदमठामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला रंग लावून शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांच्यासमवेत धुळवड साजरी केली.

First Published on: March 25, 2024 10:55 PM
Exit mobile version