शहापूर तालुक्यातील पाणवठे कोरडेठाक

शहापूर तालुक्यातील पाणवठे कोरडेठाक

शहापूर । शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य परिसरातील प्राणी पक्षी मानवी वस्तीत आढळू लागले आहेत.
उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने जंगल वनातील पाण्याचे पाणवठे, तळे आणि डबके कोरडे ठाक पडले असल्याने येथील हिंस्र प्राण्यांना, मोकाट जनावरांना आणि पक्ष्यांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने रानोमाळ भटकावे लागत आहे. हिंस्र प्राणी मानवी वस्तीकडे वळायला लागले असल्याने लोक वस्तीतील रहिवाशांवर सध्या प्राणी हल्ले वाढू लागले आहेत. गेल्या काही वर्षापासून लोकवस्तीत बिबट्या, रानडुक्कर यासारखे प्राणी हल्ले करीत असून त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यासाठी वनविभाग, सामाजिक संघटनांनी वनात या प्राण्यांसाठी पाण्याची कृत्रिम सोय करणे गरजेचे आहे. तालुक्यातील जळूबाईचा ओहळ दाट जंगलात आहे. टेकडावरील जंगलातील अनेक झरे त्याला पावसाळ्यात मिळतात. अनेक पाणवठे पावसाळ्यात भरलेले असतात, मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात हे जलाशय कोरडेठाक पडत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत.
जळूबाईच्या या पाणवठ्याच्या ठिकाणाबरोबरच बिरवाडी येथील प्रसिद्ध असलेली भांडर्‍याच्या कापातील तळ आणि त्याच कापातील पाणवठे एप्रिल महिन्याच्या आधीच कोरडेठाक पडले आहेत. मागील पाचसहा वर्षांपासून हे जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. जंगलतोडीमुळे माळरान ओसाड पडत आहे. त्यात वणवे, तापमानवाढ यामुळे प्राण्यांचे हाल होत आहेत.

उन्हाचा तडाखा वाढल्याने जंगलातील नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे. प्राणी मित्र संघटनानी पक्ष्यांसाठी घराच्या परिसरात, झाडावर, आसपास पाणी ठेवणे गरजेचे आहे. वनविभागाने वनातील प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यात पाणी उपलब्ध करून द्यावे.
– दिलीप वाघचौडे, प्राणी मित्र, सामाजिक कार्यकर्ते

नैसर्गिक पाणवठे स्वच्छ करून त्यात पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. कृत्रिम पाणवठे बनवून त्यात टँकरने पाणी टाकून प्राणीपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात येत आहे.
– एकनाथ रेंगटे, वनक्षेत्र अधिकारी, खर्डी

First Published on: April 24, 2024 9:50 PM
Exit mobile version