प्रशासकांच्या खुर्चीला निवेदन चिकटवण्याचा प्रयत्न; कमानीचे काम रखडल्याने सकल मराठा समाज आक्रमक

प्रशासकांच्या खुर्चीला निवेदन चिकटवण्याचा प्रयत्न; कमानीचे काम रखडल्याने सकल मराठा समाज आक्रमक

बदलापूर : बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे काम गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असून सातत्याने मागणी करूनही नगर परिषद प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवून अनोखे आंदोलन करण्यात आले.

आज (२५ एप्रिल) दुपारी संतोष रायजाधव, अरुण चव्हाण, राजू लाड, संभाजी शिंदे, संजय जाधव, सुहास पोखरकर, गिरीश राणे, अविनाश देशमुख, अवधूत चव्हाण, सुधीर देशमुख, राम जगताप, सदानंद भोईर आदींनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत नगर परिषद कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर घोषणाबाजी करत आंदोलक मुख्याधिकारी दालनात आले. मात्र त्यावेळी मुख्याधिकारी योगेश गोडसे अनुपस्थित असल्याने उपमुख्याधिकारी विलास जड्ये यांनी प्रशासक दालनात येऊन निवेदन स्वीकारले.

हे निवेदन देण्यापूर्वी प्रशासकाच्या खुर्चीला चिकटविण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण करण्यास नगर परिषद प्रशासनाला विलंब होत असल्याबद्दल आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे आठवड्याभरात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची कमान पुन्हा पूर्वीच्याच जागी न उभारल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने सकल मराठा समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष दिलीप पवार यांनी दिली.

First Published on: April 25, 2023 8:29 PM
Exit mobile version