‘दिवा’करांना प्यायला पाणी नाही, अनधिकृत बांधकामासाठी कसे मिळते? भाजपाची पालिका आयुक्तांकडे तक्रार

‘दिवा’करांना प्यायला पाणी नाही, अनधिकृत बांधकामासाठी कसे मिळते? भाजपाची पालिका आयुक्तांकडे तक्रार
ठाणे – एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, मग अनधिकृत बांधकाम करण्यासाठी पाणी मिळते कसे? याचे उत्तर दिवा प्रभाग समितीचे अधिकारी यांनी द्यायला हवे. येथील अनधिकृत बांधकामांना तात्काळ आवर घालणे गरजेचे असून निकृष्ट दर्जाच्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील सुविधांवर ताण येत असून नागरिकांचे जीवनमान देखील धोक्यात येत आहे. दिवा शहरातील सुविधांवर येणारा ताण पाहता तातडीने दिव्यातील अनधिकृत बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेले दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त फारुख शेख यांच्यावर कारवाई करावी, तसेच ही बांधकामे थांबवावी, अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
हेही वाचा – दिव्यातील गणेश मंडळांसमोर रस्ते दरुस्ती, कचऱ्यांच्या ढिगाचे विघ्न
पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात मुंडे यांनी दिवा सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “दिवा शहरात अनेक समस्या आहेत. पाणी समस्या तीव्र स्वरूपाची आहे. लोकसंख्या वाढत असल्याने कचरा संकलन, आरोग्य सुविधा, गटारे, सांडपाणी निचरा यासारखे अनेक प्रश्न दिवा शहरात गंभीर स्वरूप धारण करत आहेत. एकीकडे अनेक समस्या असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. ही बांधकामे तातडीने थांबविण्याचे आदेश आपण द्यावेत अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. बांधकामांना जबाबदार असणाऱ्या दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त फारुक शेख या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. आपण या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी. याबाबत आपण योग्य ती कारवाई न केल्यास येथील नागरिकांना प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागावी लागले,” असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
हेही वाचा – राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले
शहराची सुविधा देण्याची क्षमता नसताना अनधिकृत बांधकामे वाढत असतील तर हे प्रशासनाचे अपयश आहे असे मुंडे यांनी म्हटले आहे.
First Published on: August 24, 2022 6:58 PM
Exit mobile version