भाजपाने जनतेला गृहीत धरू नये

भाजपाने जनतेला गृहीत धरू नये

ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

जनतेला कधीही गृहित धरू नका, असे कर्नाटक निवडणुकीच्या निकालामुळे स्पष्ट झाले असल्याचे सांगून यापासून सर्वांनी बोध घेण्याची गरज असल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कर्नाटक निकालावर परिणाम झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. शनिवारी अंबरनाथ येथील मुकामी होते. या दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी रविवारी त्यांनी अंबरनाथ आणि बदलापूर शहराला भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अंबरनाथ पूर्व रोटरी क्लब येथे पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना कर्नाटक निवडणुकीच्या निकलाबाबत विचारले. त्यावेळी ठाकरे म्हणाले,कि विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, तर सत्ताधारी पक्ष हारत असतो, मला वाटते की हा पराभव स्वभावाचा, वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोणी वाकडं करू शकत नाही, हा जो विचार आहे, त्या विचाराचा हा पराभव आहे.
जनतेला कुणी गृहित धरू नये,असा बोध कर्नाटक निकालाने दिला. हा निकाल महाराष्ट्रातील बदलाचे संकेत आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, आताच निकाल लागला आहे. आताच कसे सांगू शकतो, लोकसभेपर्यंत या निकालाचा परिणाम राहील का? या पत्रकारांच्या प्रश्नावर, पुढे कशा कशा गोष्टी घडतात ते पाहू, आताच सांगायला मी काय ज्योतिषी आहे का? असा सवाल करून याबाबत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र राहुल गांधी यांच्या भारत जोडोचा परिणाम या निकालावर दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाच जून पासून ठाणे जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकार्‍यांची कार्यशाळा सुरु होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक शहरासाठी कार्यक्रम दिले जाणार असून महिन्याभरात त्याचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. कोणत्याही व्यक्तीच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढलेला नाही, असे सांगून गटबाजी अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान उल्हासनगर मनसे मध्ये सुरु असलेल्या गटबाजीला वैतागून ठाकरे यांनी रविवारी टाऊन हॉलमध्ये आयोजित कार्यकर्ता बैकीत मनसेची उल्हासनगर आणि बदलापूरची कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी पत्रकारांना दिली.

First Published on: May 14, 2023 9:13 PM
Exit mobile version