World Book Day : डोंबिवलीत साकारण्यात आले बुक स्ट्रीट

World Book Day : डोंबिवलीत साकारण्यात आले बुक स्ट्रीट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीतील ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने ‘पुंडलिक पै’ यांच्या संकल्पनेतून बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षीपासून वाचन प्रेमींसाठी भारतातील पहिल्या  विनामूल्य पुस्तक प्रदान उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सांस्कृतिक नगरी डोंबिवली मधील फडके रोडवर आज (दि. २१ एप्रिल) सकाळी ५ वाजता बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत हा बुक स्ट्रीट रसिक वाचकांसाठी खुला ठेवण्यात आला होता.

वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये रसिकांना कूपनद्वारे प्रवेश दिला गेला .त्यावर तिथे उपलब्ध असलेले कोणतेही एक पुस्तक पूर्णपणे मोफत निवडता येणार आहे. पुस्तकांपासून तयार केलेली ‘आय लव्ह बुक्स’ ही प्रतिकृती यंदाच्या बुक स्ट्रीटचे खास आकर्षण ठरली आहे. बुक स्ट्रीट मध्ये सुमारे एक लाख पुस्तके मांडण्यात आली होती.गतवर्षी ४ हजार ५०० वाचकांनी या उपक्रमाला भेट दिली होती, तर यंदाचे वर्षी ८ हजार ५०० वाचन प्रेमींनी उपस्थिती लावून पुस्तके घेतली . त्यामुळे खऱ्या अर्थाने यावर्षीही हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.

या उपक्रमास कल्याण लोकसभेच्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनीही उपस्थिती लावून पुस्तके घेतली .बुक स्ट्रीट उपक्रम यशस्वी होण्यास कल्याण डोंबिवली महानगरपलिका, डोंबिवली शहर वाहतूक विभाग आणि डोंबिवली शहर पोलिस विभाग यांचे सहकार्य लाभले आहे.

First Published on: April 21, 2024 7:26 PM
Exit mobile version