न्यायप्रविष्ट जागा रिकामी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का ?

न्यायप्रविष्ट जागा रिकामी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का ?

शाळेच्या मैदानासमोरील सव्वा एकर जागा आणि किमान सातशे आठशे झोपडपट्ट्यांच्या संदर्भात एनआरसी कारखान्याच्या विरोधात कल्याण दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल आहे. मागासवर्गीय सुधारण हित संस्थेने याबाबत तक्रार केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलिसांनी झोपडीवासीयांच्या जागा रिकाम्या करण्यासाठी केलेली कारवाई चुकीची असल्याचा झोपडीतील रहिवाशांनी केला आहे. मोहने चौकी जवळील मोकळ्या जागेत वाहन पार्किंग उभारण्यासाठी  काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी येथील झोपडपट्टीतील रहिवाशांनी त्याला विरोध करत काम बंद करायला लावले. यानंतर खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार पोलिसांच्या ताफ्या सह घटनास्थळी येऊन त्यांनी कारवाई सुरू केल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. ही कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघटनेने कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली आहे.

कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग समाजाचे राज्य सरचिटणीस दिलीप रोकडे यांनी, खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली असून लवकरच या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदनात केलेल्या आरोपा संदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे सीनियर इन्स्पेक्टर अशोक पवार यांना भ्रमणध्वनीवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.

त्यामुळे त्यांची नेमकी प्रतिक्रिया समजू शकली नाही. दरम्यान कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी मातंग समाजातील शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपणास निवेदन दिल्याची माहिती दिली आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, अखिल भारतीय मातंग समाज संघाचे राज्य सरचिटणीस दिलीप रोकडे,  चक्रधर धुळे, एकनाथ साबळे, मालनबाई साठे, नागरबाई पवार, भीमा कांबळे , श्रावण बनसोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

First Published on: February 4, 2022 8:39 PM
Exit mobile version