बारबालेवर हल्ला करून सीएची आत्महत्या

बारबालेवर हल्ला करून सीएची आत्महत्या

आत्महत्या

वारंवार पैशांची मागणी करणार्‍या बारबालेवर चाकूने हल्ला करून सीए असणार्‍या 54 वर्षीय इसमाने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्यातील कापूरबावडी येथे घडली. कापूरबावडी पोलिसांनी जखमी बारबालेला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सीए याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभराज राघनी (54) असे या सीएचे नाव आहे. कल्याण येथील खडकपाडा येथे राहणारे शोभराज हे पेशाने सीए होते. शोभराज याचे सावरकर नगर येथे राहणार्‍या एका 33 वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होती. यातूनच त्यांच्यात अनेक दिवसांपासून खटके उडत होते. 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील बाळकूम नाका येथील राज रेसीडेन्सी हॉटेलमधील भाड्याने घेतलेल्या 408 क्रमांकाच्या खोलीत बोलावून घेतले.

तिथे पुन्हा त्यांच्यात पैशाच्या देवाण घेवाणीतून वाद झाला.यातूनच संतापलेल्या शोभराजने तिच्या खांद्यावर, गालावर आणि पायांवर धारदार चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाल्यानंतर त्यानेही हॉटेलच्या खिडकीून उडी मारली.यातच डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 24 मार्च रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न करून आत्महत्या केल्याचा गुन्हा शोभराज याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on: March 27, 2021 4:00 AM
Exit mobile version