कल्याणमध्ये लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

कल्याणमध्ये लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

कल्याण शहराच्या विविध भागात दिवसाढवळ्या, रात्रीच्या वेळेत नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. या वाढत्या घटनांनी शहरातील नागरिक हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

डोंबिवलीत सोमवारी हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. एका प्रकरणात एका पालिका कामगाराला, दुसर्‍या प्रकरणात एका व्यावयासिकावर हल्ला करण्यात आला. कल्याणमध्ये दोन दिवसात लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. विठ्ठलवाडी येथे राहणारे व्यावसायिक स्वप्निल देढे सोमवारी रात्री साडे दहा वाजता आपले दुकान बंद करून विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक रस्त्याने पायी चालले होते. साईनगर नाल्याच्या भागात गेल्यावर अचानक त्यांच्या पाठीमागून दोन इसम आले. त्यांनी काळोखात देढे यांना पकडून ठेवले. त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. देढे यांनी प्रतिकार करताच त्यांना चाकुने दुखापत करण्यात आली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.

दुसर्‍या प्रकरणात उल्हासनगर येथे राहणारे शेषराव ससाणे (75) कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्याने पायी चालले होते. अचानक एक रिक्षा चालक त्यांच्या जवळ आला. त्याने दिवाळी भेटीची मागणी ससाणे यांच्याकडे केली. ससाणे यांनी आपण तुम्हाला ओळखत नसल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने ससाणे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बटव्यातील पाच हजार रूपयांची रक्कम काढून पळ काढला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात ससाणे यांनी तक्रार केली आहे.

First Published on: November 29, 2023 10:30 PM
Exit mobile version