राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासोबत आव्हाडांचे खटकले, कार्यालयाबाहेरच समर्थकांची घोषणाबाजी

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासोबत आव्हाडांचे खटकले, कार्यालयाबाहेरच समर्थकांची घोषणाबाजी

कळवा – जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या वियनभंग प्रकरणामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे राजन केणे यांनीच भाजपच्या महिला पदाधिकारी रिदा राशीद यांना तक्रार दाखल करण्यास भाग पाडले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी केला आहे. यावरून मंगळवारी रात्री राजन केणे यांच्या कार्यालयासमोर तुफान घोषणाबाजी झाली. राजन केणी गद्दार है अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुंब्र्यात जल्लोष केला. यावेळी त्यांनी गद्दार पेहचान कौन अशा आशयाचे बॅनरही लावले होते. यावेळी जल्लोषासाठी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली राजन केणे यांच्या कार्यालयाबाहेर येताच राजन केणी गद्दार है! अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राजन केणे व त्यांचे कुटुंबातील दोन नगरसेवक पूर्वीचे शिवसेनेचे नगरसेवक होते. त्यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण सध्या त्यांचे आव्हाड समर्थक नगरसेवकांशी फारसे जमत नसल्याचे बोलले जाते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क वाढल्याचे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे ते पुन्हा एकदा भगवा हातात घेतात का? याची चर्चा सुरू झाली आहे. तर रॅलीत “गद्दार” म्हणून संबोधल्याने केणे समर्थक कार्यकर्तेही या पुढे जश्यास तसे प्रत्युत्तर देणार असल्याचे बोलले जाते. तसंच, या घोषणाबाजीविरोधात राजन केणे मुंब्रा पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे मुंब्र्यात महापालिका निवणुकीआधीच मोठा शिमगा पेटणार असल्याची चर्चा सध्या मुंब्रा परिसरात सुरू झाली आहे.

First Published on: November 16, 2022 3:58 PM
Exit mobile version