सावधान…पाण्यात मगर आहे

सावधान…पाण्यात मगर आहे

येऊरमध्ये फिरायला येणार्‍यांवर ठाणे वन विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी पायथ्यापासून वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. रविवार आणि सोमवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा येऊरच्या नील तलावात नाहक निष्पाप बळी जाऊ नये यासाठी दोन्ही विभागांनी कंबर कसली आहे. त्यातच वन विभागाने तलाव परिसरात ‘सावधान… पाण्यात मगर आहे’ असे आशयाचे बोर्ड लावले आहेत. डोहात पोहणे आणि उतरणे धोकादायक आहे, असा इशारा दिला आहे.

गेल्या रविवारी सकाळी येऊर पाटोनापाडा येथे फिरायला गेलेल्या पोलीस लाईनमधील बालकाचा नील तलावात पोहताना मृत्यू झाला. या घटनेनंतर काही तासांच्या अंतरावर राबोडीतील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सोबतीला आलेला दुसरा तरुण मित्रांच्या मदतीने बचावला होता. त्यानंतर 24 तासांच्या आत त्या तलावात आणखी दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे शहरात खळबळ माजली. यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच धोकादायक नील तलावात बुडून मृत्यू होण्याच्या सत्राला वेळीच रोखण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानुसार मंगळवारपासून वर्तकनगर पोलीस आणि वनविभागाने जागता पहारा ठेवला आहे. घटनेला आठ दिवस होत नाही तोच वन विभागाने नामी शक्कल लढवत बोर्ड आणि फलक लावले आहेत.

त्याच्यावर अवैधरित्या फिरणार्‍यांवर आणि तलावात उतरणार्‍यांवर तसेच पोहण्याचा मोह होणार्‍यांच्या मनात भीती निर्माण व्हावी. यासाठी आणि सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी तेथे लावलेल्या बोर्डवर सावधान… पाण्यात मगर आहे. धोका धोका’ असा फलक लावला आहे. त्यावर वन्यजीव कायद्यानुसार तीन वर्षे कारावासाची किंवा २५ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असे म्हटले आहे. त्यातच रविवारी सकाळपासून मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस आणि वनविभागामार्फत फिरायला जाणार्‍यांना येऊरमध्ये जाऊ दिले जाणार नाही. तसेच तलाव परिसरात पोलीस आणि वन विभागाच्या विशेष पथकांकडून येणार्‍या पर्यटकांना हटकण्यात येणार आहे.

निष्पाप बळी जाऊ नये म्हणून पाच पोलिसांचा बंदोबस्त रविवारपासून येऊर परिसरात असणार आहे. मुख्य प्रवेशद्वारासह त्या तलावात येणार्‍या नागरिकांवर नजर ठेवली जाणार आहे.
– संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर

पुन्हा असे प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी नव्याने बोर्ड आणि फलक लावले आहेत. फिरायला येणार्‍यांवर पोलिसांच्या मदतीने वनविभागही वॉच ठेवत आहे. वनविभागाचे 10 जणांचे पथक तैनात ठेवले आहेत. त्यांच्याद्वारे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
– राजेंद्र पवार, वन विभाग अधिकारी

First Published on: June 27, 2021 5:10 AM
Exit mobile version