शिक्षण विभागाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन

शिक्षण विभागाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील कार्यरत शिक्षकांचे विविध विषय प्रलंबित असुन या बाबत अति-आयुक्त, उप-आयुक्त (शिक्षण) व प्रशासन अधिकारी यांची मागील ६ महीन्यात प्रत्येकी किमान ५ ते ६ वेळा भेट घेऊन हे विषय मार्गी लावण्याबाबत विनंती करुनही तसेच आयुक्त स्तरावरुन काही विषयांना मंजूरी असतानाही काही विषय अद्याप अंतिम झालेले नसल्यामुळे नाईलाजास्तसव कास्ट्राईब शिक्षक संघटनेने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १० एप्रिल रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अध्यक्ष संजय ओंकारेश्वर यांनी दिली. यावेळी ठाणे जिल्हा सचिव प्रविण कांबळे, कार्याध्यक्ष दिलीप चेडे, केडीएमसी सचिव डी. सी. मुंढे, खजिनदार सागर धामोडे, प्रमुख संघटक चंद्रकांत धापटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार पदवीधर शिक्षक नेमणुकीस आयुक्तांची डिसेंबर २०२२ मध्ये मंजूरी झालेली असुन अद्याप प्रत्यक्ष नेमणुक देण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक शाळेमध्ये उपलब्ध नसल्यामुळे गुणवत्तेवर परीणाम होत असल्याने तातडीने शिक्षक समायोजन करण्यात यावे. कडोंमपा मधील अनेक अनुकंपाची पदे भरण्यात आलेली असुन शिक्षण मंडळातील मयत कर्मचा-यांच्या ९ पाल्यांना अद्याप अनुकंप तत्वाचा लाभ देण्यात आलेला नाही. शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय पदे जसे शिक्षण विस्तार अधिकारी ही पदोन्नतीची व सरळसेवेची १००% पदे रिक्त असून सदरील पदे पात्र शिक्षकांमधुन तातडीने भरण्यात यावीत. पदे भरेपर्यंत पात्र शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात यावी. शिक्षकांना वरीष्ठ वेतनश्रेणी लागू करुन ५ वर्षे पूर्ण होऊनही महानगरपालिकेच्या ५० टक्के हिश्श्याची वेतनाची फरकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. शिक्षकांनी शासनाच्या धोरणानुसार २४ वर्षाची सेवा पूर्ण करुन निवडश्रेणी प्रशिक्षण पुर्ण करुनही ४-५ वर्षापासून शिक्षकांच्या निवडश्रेणीचे प्रस्तावाबाबत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अनेक शिक्षक निवडश्रेणी लाभापासून वंचित आहेत.

शिक्षण विभागात फक्त २ लिपिक असुन किमान ८-१० पदे रिक्त असल्यामुळे शिक्षकांची अनेक कामे प्रलंबित आहेत यामध्ये सेवापुस्तिका अद्ययावत नसणे, भ.नि.नि च्या ३ वर्षापासून स्लिप न मिळणे, ७ व्या वेतन आयोगाचे फरक तक्ते लेखा व लेखा परीक्षण विभागाकडुन तपासणी करुन न मिळणे, वेळेत वेतन न होणे या सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लाभांचे उपक्रमांची विहीत वेळेत अंमलबजावणी झालेली नाही जसे अद्याप पर्यंत क्रीडा महोत्सव, शैक्षणिक सहल इत्यादी उपक्रम तरतुद असुनही उपक्रमांची कार्यवाही झालेली नाही. हे उपक्रम उन्हाळयात व परीक्षा कालावधीत घेण्यात येऊ नयेत. यासह इतर अनेक मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

First Published on: March 24, 2023 10:49 PM
Exit mobile version