यंदाही दिवा तुंबणारच !

यंदाही दिवा तुंबणारच !
ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे दिवा शहरातील प्रमुख नाले यावर्षी साफ न झाल्याने दिवा तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर,या नालेसफाईत हात सफाई करणाऱ्या दिवा प्रभाग समितीच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी दिवा भाजपच्या वतीने मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

जून महिन्याची 13 तारीख आली तरी दिवा शहरातील प्रमुख नाले अद्यापही साफ केलेले नाहीत. बहुतांश नाल्यातील गाळ तसाच असून नालेसफाई झाली नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे. एकीकडे पालिका आयुक्त शंभर टक्के नालेसफाईचा आग्रह धरत असताना दिव्यातील नालेसफाईत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून त्याचे पेमेंट थांबवण्यात यावे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.शिवाय दिव्यातील नाले ज्या पद्धतीने साफ करण्यात आले आहेत ते पाहता यात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. दिव्यातील नालेसफाईच्या व अंतर्गत गटारे साफ करण्याच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे तसेचबपालिका आयुक्तांनी दिव्यातील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित करावा आम्ही त्यांना साफ न झालेले नाले दाखवू असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.

 येथे नालेसफाई झालेली नाही
साफ न केलेल्या नाल्यांमध्ये बेडेकर नगर, ओमकार नगर,तिसाई नगर,मुंब्रादेवी कॉलनी, रिलायन्स टॉवर येथील नाला,साळवी नगर साबेगाव येथील मुख्य नाला, रेल्वे कन्वर्ट
या नाल्यांचा समावेश असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.
First Published on: June 13, 2023 10:28 PM
Exit mobile version