ते आले, पाहणी केली आणि निघून गेले!

ते आले, पाहणी केली आणि निघून गेले!

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त खर्चाने बांधलेल्या बहुचर्चित वडवली पुलाचे शनिवारी संध्याकाळी ५ वाजता उद्घाटन होते. मात्र, राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तब्बल दीड तास उशिरा आले. हौशी कार्यकर्त्यांनी उद्घाटनाची रिबिन लावली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा उद्घाटनाच्या ठिकाणी न उतरता त्यांनी पुलाची अखेरपर्यंत पाहणी केली आणि ते निघून गेले. गेल्या आठवड्यात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा पार पाडला होता. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शनिवारी अधिकृतपणे पुलाच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे योजले होते.

त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर आपापल्या पक्षाचे झेंडे लावले होते. सामाजिक अंतराचे भान मात्र दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी पाळल्याचे दिसून येत नव्हते. उद्घाटनाची फीत कापण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते सक्रिय झाले होते. मात्र, पालकमंत्र्यांनी आपल्या गाडीतून न उतरता पुलाचा पाहणी दौरा केला. गाडी आल्यानेच उद्घाटन झाल्याचे तत्वतः सर्वांनी मान्य केले. उद्घाटनाच्या येथे पालकमंत्री न थांबता ते आले, वडवली पूल कसा आहे याची पाहणी केली आणि आपल्या ताफ्यासह ते निघून गेले.

यावेळी भाजपचे भिवंडीचे खासदार कपिल पाटील, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र पाठक, त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, रेल्वेचे मंडळ प्रबंधक शालव गोवल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अशाच स्वरूपाचे उद्घाटन वालधुनी पुलाचे देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम हायजॅक!

हा कार्यक्रम शासकीय असताना शिवसेना व भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कुठलाही प्रोटोकॉल न पाळता प्रमुख पाहुणे बसण्याच्या ठिकाणी आपल्या पक्षाचे झेंडे लावल्याचे दिसून येत होते. तर प्रशासकीय अधिकारी आडबाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. थोडक्यात हा कार्यक्रम भाजप व शिवसेनेने हायजॅक केल्याचे दिसून आले.

First Published on: March 28, 2021 5:45 AM
Exit mobile version