पालिकेच्याच महिला उपायुक्तांना ५ हजारांचा दंड

पालिकेच्याच महिला उपायुक्तांना ५ हजारांचा दंड

प्लास्टिक वापरल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा उपायुक्तांनी पालिकेच्याच महिला उपायुक्तांना ५ हजारांचा दंड ठोठावल्याची घटना सोमवारी महापालिका मुख्यालयात घडली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात मान्यवरांच्या स्वागतासाठी आणलेल्या पुष्पगुच्छाना प्लास्टिक गुंडाळले असल्याने घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजक सुरक्षा विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. कोकरे यांच्या या पवित्र्यामुळे त्याठिकाणी उपस्थित पालिका आयुक्तांसह इतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरक्षा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात  मान्यवरांच्या स्वागतासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीतून  पुष्प गुच्छ आणले. कार्यक्रमातच प्लॅस्टिकचा वापर केला होता. ही बाब कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आयोजकांना चांगलेच झापले. तसेच जागेवरच सुरक्षा विभागाचे  विभागीय उपायुक्त यांना प्लॅस्टिक बंदीचा वटहुकूम मोडल्या प्रकरणी पाच हजाराचा दंड ठोकावला.

एकीकडे पालिका प्रशासन पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्लॅस्टिक बंदीचे धडे शिकवीत प्रतिबंधीत प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई करत आहे. असे असताना पालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागालाच या कारवाईचा विसर पडल्याने हा प्रकार पालिकेच्या उपायुक्तांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

First Published on: January 3, 2022 7:40 PM
Exit mobile version