महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक

महेश आहेर मारहाण प्रकरणी चौघांना अटक

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमकीची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यावरून ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. या मारहाणी प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यातील चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर आणि विशंत गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

दरम्यान या चारही आरोपींना आज दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड, त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

या क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर यांच्या मदतीने शूटर तैनात केल्याचे या संभाषणात एका व्यक्तीने म्हटले आहे. सदर क्लिपमध्ये बोलणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहे. दरम्यान ऑडिओमधील व्यक्ती ही ठाणे महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर असल्याचा दावा केला जात आहे.

या ऑडिओ क्लिपनंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रभारी सहायक आयुक्त महेश आहेर यांना त्यांच्या अंगरक्षकसोबत असताना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट चारच्या बाहेर बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडला. या मारहाणीत महेश आहेर यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. आहेर यांना पोलीस संरक्षण आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत होते. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ठाण्यात तीन मजली इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून १५ जणांची सुखरूप सुटका

First Published on: February 16, 2023 11:29 AM
Exit mobile version