आईची हत्या तर पित्याला गंभीर दुखापत करणाऱ्या लेकाला अटक

आईची हत्या तर पित्याला गंभीर दुखापत करणाऱ्या लेकाला अटक

उल्हासनगर येथे भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना ताजी असताना, झालेल्या भांडणातून पोटच्या लेकाने आईची हत्या करून पित्याला गंभीररित्या जखमी केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (११ मे) ठाण्याच्या कासारवडवली परिसरात घडली. या घटनेनंतर संकल्प विलास भाटकर (३१) मारेकरी मुलगा मोटार सायकल घेऊन पसार झाला होता. मात्र  पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने पथक तयार करून त्याला अवघ्या काही तासात कुर्ला येथून ताब्यात घेतले आहे.

मारेकरी संकल्प हा कोपरी येथे राहणारा असून त्याचे आईवडील घोडबंदर रोड येथील विहंग हिल्स येथे राहत आहेत. दोन आठवड्यापूर्वी मारेकऱ्याचे मयत विनीता विलास भाटकर (६६) आणि जखमी विलास मुंकुद भाटकर (७१) या आईवडिलांसोबत भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून गुरुवारी सकाळी तो घोडबंदर रोड येथील आईवडिलांच्या घरी आला होता. यावेळी त्याने सुरीने आई विनिता हिच्या पोटावर तसेच शरीरावर इतर ठिकाणी वार केले. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्याने त्याचे वडील विलास यांच्या मानेवर व शरीराच्या इतर भागावर सुरीने वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारार्थ ठाण्यातील टायटन मेडीसीटी हॉस्पीटल दाखल केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर संकल्प याने मोटार सायकल वरून तेथून पळ काढला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके तयार केले. त्यानंतर त्याला काही तासात मुंबई,कुर्ला नेहरूनगर येथे ताब्यात घेतले.  याप्रकरणी सौरभ भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे करत आहेत.

संकल्प हा मानसिक रुग्ण ?
या घटनेनंतर सोशल मीडियावर कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असा एक मॅसेज फिरत होता. त्यामध्ये संकल्प हा स्टेरॉईड  घेत असल्याने मानसिक रुग्ण आहे व त्याच्याकडे घरातील कांदा कापण्याचा चाकू आहे कुठे मिळून आल्यास योग्य ती खबरदारी घेऊन त्यास ताब्यात घ्यावे व कासारवडवली पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी. म्हटले होते. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीच माहिती मिळून शकली नाही. पोलिसांनी
प्रेस नोट काढून प्रसारमाध्यमांना या घटनेपासून लांब ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

First Published on: May 11, 2023 9:49 PM
Exit mobile version