जिल्ह्यात ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

जिल्ह्यामध्ये ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयातून प्रयत्न करावेत. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण, महापालिका, नगरपरिषद क्षेत्रांमध्ये सुमारे १७ लाख ध्वजांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सोमवारी येथे दिल्या.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी नियुक्त जिल्हास्तरीय कार्यान्वयन समितीची बैठक डॉ. दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी यांच्या समिती सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक दादाभाऊ गुंजाळ, जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध महापालिकांचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वराज्य महोत्सव उपक्रमाचा देखील आढावा घेण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशभर ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रत्येक नागरिकांच्या घरावर, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणीक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फुर्तीने उभारणी करण्यासाठी ‘हर घर तिरंगा; हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग व नगरपालिका क्षेत्रात सुमारे ३ लाख ९२ हजार ४७८ इतकी घरे, संस्था आहेत त्यासाठी तेवढ्याच संख्येने ध्वजांची आवश्यकता असून जिल्ह्याच्या सहा महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १३ लाख ध्वजांची आवश्यकता आहे, असे मिळून जिल्ह्यात एकूण १७ लाख ध्वज उपलब्ध करून घेण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ध्वजाची खरेदी तातडीने करावी, असे निर्देश डॉ. दांगडे यांनी दिले.
 विविध शाळा, महाविद्यालये, छात्र सेना, सेवा योजना, युवा मंडळ, ग्रामपंयात कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, यांच्यामधून प्रत्येकी २०० घरांना किमान एक याप्रमाणे तिरंगा स्वयंसेवक नेमण्यात यावा. ध्वजसंहितेचे तंतोतंत पालन करून ध्वज लावण्यात आला आहे याबाबत तिरंगा स्वयंसेवकांमार्फत संनियंत्रण करावे, असे डॉ. दांगडे यांनी सांगितले.
दरम्यान, ९ ते १७ ऑगस्ट याकालावधीत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबतही या बैठकीत नियोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम आदी विविध प्रकारचे उपक्रम जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर घेण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी सांगितले. त्याच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
First Published on: July 11, 2022 9:54 PM
Exit mobile version