महिला सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

महिला सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला

ठाणे महापालिका माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या कारवाईसाठी गेल्या असताना, अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कासावडवली भागातील मार्केट परिसरात घडली. त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेला त्यांचा अंगरक्षकही जखमी झाला आहे. पिंपळे यांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षक याचे एक बोट हल्ल्यात तुटून हातापासून वेगळी झाले आहे. त्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताची बोटे जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हा हल्लाखोर फेरीवाला यादव याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम, फेरीवाले आणि हातगाड्यांवर सद्यस्थितीत सर्वच प्रभाग समितीमध्ये कारवाई सुरू आहे. त्यानुसार माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त पिंपळे या कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत तसेच रस्ता किंवा पदपथ अडविणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. कारवाई सायंकाळी ६.३० च्या सुमारास सुरू असतानाच संतप्त झालेल्या यादव या फेरीवाल्याने, पिंपळे यांच्यावर चाकूने डोक्यावर हल्ला चढवला; पण त्यांनी हात डोक्यावर ठेवल्याने त्या हल्ल्यात हाताची तीन बोटे कापली गेली आहेत.

याचदरम्यान त्यांचा अंगरक्षक त्यांना वाचविण्यासाठी पुढे आल्यावर त्याच्याही एक बोटाला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्या फेरीवाल्याने पोलीस पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून तोच चाकू आपल्या गळ्यावर ठेवून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

‘या हल्ल्यात सहायक आयुक्त पिंपळे यांच्या हाताची तीन तर त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अंगरक्षकाच्या हाताचे एक बोट कापले गेले आहे. त्या दोघांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.’– मारुती खोडके, उपायुक्त, जनसंपर्क अधिकारी, ठामपा

First Published on: August 30, 2021 5:00 AM
Exit mobile version