सीगल पक्ष्यांना खायला दिल्यास कारवाई

सीगल पक्ष्यांना खायला दिल्यास कारवाई

वनपरिक्षेत्र कार्यालय, कल्याण व वॉर संस्थेमार्फत कल्याण शहरातील किल्ले दुर्गाडी परिसरातील खाडी किनारा व गांधारी येथील खाडी किनारा येथे परदेशातुन स्थलांतरीत झालेल्या सिगल पक्षांच्या संरक्षण व संवर्धनार्थ जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहे. या सीगल पक्ष्यांना शेव गाठी खायला दिल्यास आता कारवाई होणार आहे.
दरवर्षी युरोपातून लाखो सिगल पक्षी भारतात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान येत असतात. सिगल हा एक समुद्री पक्षी असून त्याचे मुख्य अन्न मासे, किटक, किडे, गांडुळ हे आहे. परंतु काही स्थानिक नागरीक या पक्षांना शेव, गाठी, कुरमुरे इत्यादी तेलकट पदार्थ खाऊ घालत आहेत. असे अन्न खाल्याने या पक्षांच्या पाचन व प्रजनन शक्तीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने आणि त्यांचे सहकारी व वॉर फाऊंडेशनच्या टिमने खाडी किनारालगत येणार्‍या भागात सिगल पक्षांबाबत जनजागृती केली. नागरिकांनी या पक्षांना तेलकट पदार्थ खाऊ घालू नये, असे आवाहन या जनजागृती अभियानात करण्यात आले. तसेच असे कृत्य करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५२ अन्वये गुन्हा असून, असे कृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

या जनजागृती मोहीमेत वनपाल एम. डी. जाधव, वनरक्षक रोहित भोई, वनरक्षक योगेश रिंगणे, वनपाल शरद कंटे, वनरक्षक विनायक विशे, तसेच वॉर फाऊंडेशन कल्याणचे अध्यक्ष योगेश कांबळे, सचिव सुहास पवार, प्रमोद आहेर, विशाल कंथारीया, शैलेश अहिरे, स्वप्निल कांबळे, प्रियांका कांबळे, सिद्धेश देसाई, पार्थ पाठारे, रेहान मोतीवाला, फाल्गुनी दलाल, विशाल सोनावणे, श्रुती नेवतकर, प्रतिक पाटील, अथर्व याराप्नोर, भरत जाधव यांनी सहभाग घेतला.

First Published on: February 23, 2022 9:22 PM
Exit mobile version