दोन महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५६ जणांना केले अटक

दोन महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने २५६ जणांना केले अटक

परराज्यातील मद्यासह हातभट्टीचे मद्य विक्रीस बंदी आहे. त्यातच ते लपून छपून निर्मिती तसेच चोरून बेकायदेशीररित्या वाहतूक करत त्याची विक्री केली जात आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क (ठाणे )विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल ४४१ गुन्हे दाखल केले. तसेच २५४ जणांना याप्रकरणी अटक करत, त्यांच्याकडून सुमारे पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सात हजार लिटर हातभट्टी दारू, दोन लाख ९० हजार लिटर रसायन, ३५५ लिटर देशी मद्य,  १३५ लिटर विदेशी मद्य, ३६३ लिटर बियर, ३७५ लिटर ताडी,  ३२० किलो काळा गूळ, दुसऱ्या राज्यातील ७३ लिटर मद्य, १२ वाहनांचा समावेश असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.

ठाणे जिल्ह्यात छुप्या मार्गाने अवैध गावठी दारू, दिव-दमण, गोवा अशा परराज्यातून येणारी  दारूच्या विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने करडी नजर ठेवत ही कारवाई केली आहे. एप्रिल एप्रिल मे या दोन महिन्यात एक कोटी ७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. या विभागाची जिल्ह्यात ठाणे ( ए बी सी डी एफ), डोंबिवली, कल्याण भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ आदी ठिकाणी पथक तैनात आहे. त्या पथकामार्फत दोन महिन्यात २५३ वारस तर १८८ बेवारस असे एकूण ४४१ गुन्ह्यांची नोंद करत २५६ जणांना अटक करण्यात यश आले.

” खाडी किनारी अथवा जंगल भागात हातभट्टी दारूची कारवाई करताना विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कसोटी असते. काही वेळा जीवावर बेतण्याची शक्यता असली तरी अवैध दारू विक्रीला वेसण घालण्याचे काम विभाग करतो आहे. तसेच केलेली कारवाई ही एप्रिल आणि मे या दोन महिन्यातील आहे. ”

– डॉ. निलेश सांगडे , अधीक्षक, उत्पादन शुल्क ठाणे.

First Published on: June 12, 2023 10:29 PM
Exit mobile version